मोखाडा : 27 डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बेसावध शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे .यात नागलीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. मोखाडा तालुक्यात 3 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर नागलीचे पीक घेतले जाते. नागली हे पीक जव्हार, मोखाडा तालुक्यातील मुख्य पीक आहे. या पिकाचा उपयोग येथील शेतकरी हे उपजीविकेसाठी करीत असतात. त्यामुळे या पिकाला विशेष मान आहे. नागली अर्थात कणसरी देवीची यथावत पूजा करून,रास भरून, नैवद्य दाखवून मगच हे पीक घरी आणले जाते.
मोखाडा तालुक्यात कंपनी करून नागलीचे पीक खळ्यावर साठवले जाते व एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्यात नागलीचे पीक मळले जाते . तसेच घरी आणून कणग्यांमध्ये साठवून ठेवले जाते. पुढे वर्षभर आवश्यकतेनुसार उपजीविकेसाठी उपयोग केला जातो. परंतु अवकाळीने या उपजीविकेच्या पिकाचीच प्रचंड नासधूस केल्याने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे.
नागली आणि भात ही दोन प्रमुख पिके असून त्यांचा उपयोग प्राधान्याने उपजीविकेसाठी केला जातो. या अगोदर अशाच प्रकारे प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात वाळत घातलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आता नागलीला ही पावसाने ओलेचिंब केल्याने शेतकर्यांची उरली सुरली आशाही संपुष्ठात आली आहे. त्यामुळे आता खायचे काय? हा यक्ष प्रश्न शेतकर्यांना भेडसावणारा आहे.