मोखाडा : जव्हार, मोखाडा म्हटला की घनदाट जंगले आणि डोंगर दर्यांनी व्यापलेला परिसर. त्यामुळे येथील आदिवासी नागरिकांची राहण्याची व्यवस्था देखील वन जंगलावर आधारलेली आहे.या भागातील आदिवासी नागरिकांची घरे साग, शिसव आणि सादडा, हेंद, खैर या झाडाच्या लाकडाचा वापर करून तयार केलेली मोठी आणि टुमदार वडिलोपार्जित घरे असायची. परंतु आता दिवसेंदिवस जंगले कमी होत चालल्याने लाकूड प्रचंड महाग झाला आहे.शिवाय दरवर्षी पावसाआधी या सगळ्याच घरांची करावी लागणारी दुरूस्ती आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ ,उपयुक्त साहित्य आणि लागणारा वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्रामीण भागातील ही कौलारू टुमदार घरांच्या जागी आता स्लॅब, सिमेंट आणि टाटा स्टीलचे पत्रे वापरुन घरे बांधली जात आहेत.
साधारण ५० वर्षांपूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक वाडी तसेच पाडा आणि वस्तीत गवताचे छत असलेली घरे मोठ्या प्रमाणावर असायची. उन्हाळ्याच्या दिवसांत या छतांची दरवर्षी दुरुस्ती करावी लागायची. त्यानंतर बारीक कौलांची मागणी वाढू लागली. जवळपास २० वर्षांपासून बारीक कौले तयार करणार्या कारागिरांना आपला व्यवसाय हळुहळू बंद करावा लागला. कारण छोट्या कौलांच्या ऐवजी मोठी कौले कारखान्याच्या माध्यमातून तयार होऊ लागली. या कौलांचा वापर देखील काही दिवस झाला. मात्र मोठ्या कौलांचा उपयोग करताना लाकडी फाटे,बांबू तसेच लाकूड मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.त्यामुळे याला पर्याय म्हणून आता ग्रामीण भागातील नागरिकांनी बदल म्हणून घराच्या छतावर सिमेंटचे पत्रे तर कुठे स्टीलचे पत्रे टाकून घराचे छत लपविण्याचा सायास सुरू केला आहे.पक्क्या घरामुळे दरवर्षी छताच्या दुरुस्तीवर होणार्या खर्चाची बचत होत असल्याने निवार्याची ही व्यवस्था नागरिक सध्या जास्त प्रमाणात अवलंबत आहेत.