मोखाडा : मोखाडा तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून मटका आणि जुगार खुलेआम चालू असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. यामुळे मोखाडा पोलिसांच्या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त होत असून या जुगार मटक्यामुळे अनेक संसार मात्र उद्धस्वत होत आहेत. याशिवाय तालुक्यात गांजा अंमली पदार्थांची सुध्दा विक्री जोरात होत असल्याचे देखील काही घटनांवरून सिद्ध झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून तर एका मित्रानेच मित्राचा केलेला खून या घटनांवरून आरोपी नशेत असल्याचे दिसून आले होते.
मोखाडा आणि खोडाळा या दोन्ही शहरात सध्या जुगार आणि मटका जोरात सुरू आहे. अगदी प्रथम दर्शनी भागात हे सगळं सुरू असतानाही यावर कोणाचेच अंकुश नाही. मुळात त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद रक्षणकर्त्यांना देण्यात येत असल्याच्याही चर्चा आहेत. यामुळे अशा अवैध धंदा करणार्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि कायमस्वरूपी हे धंदे बंद करावेत, अशी मागणी मोखाडावासी करताना दिसत आहेत. मोखाडा सारख्या दुर्गम भागात अगोदरच रोजगाराची मारामार आहे. स्थलांतर, कुपोषण अशा समस्या आवासून उभ्या आहेत.यामुळे कुटुंब, प्रपंच चालवणे कठीण होत असतानाच या जुगार आणि मटक्यामुळे घरातील शेवटचा पैसाही संपून उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी होत आहे.