मोखाडा: रेशनिंग दुकानात सहजासहजी उपलब्ध होणारे केरोसीन (घासलेट) हे शासनाने अचानकपणे बंद केल्याने गाव वाड्यातील नागरिकांना महावितरणची लाईट गेल्यानंतर रात्री अंधारात रहावे लागत आहे.तालुक्यात आजही अशा काही वाड्या वस्त्या आहेत की ज्याठिकाणी वीज पोहचलेली नाही आणि जरी पोहचली असेल तरी रात्रीच्या वेळी सारखा लपंडाव सुरू राहतो. दोन – तीन तास लाईट येत नाही. अशावेळी वाड्या वस्त्यांसाठी केरोसीन हे प्रकाशमय ठरत होते.परंतु, शासनाच्या केरोसीन बंदीमुळे आदिवासींना रात्र अंधारात काढावी लागत आहे.
गावातील प्रत्येक रेशनिंग दुकानात रेशनकार्ड धारकांना सहजासहजी उपलब्ध होणार्या घासलेटचे अनेक फायदे होते.आज मितीला तालुक्याच्या कानाकोपर्यात विजेचे खांब पोहचले असले तरी सुद्धा त्या विजेच्या खांबावरुन प्रवाहित होणारी लाईट कितीकाळ राहील याची काहीच गँरटी नाही. अशावेळी केरोसीन चिमणीत (बत्ती) टाकून त्याची वात रात्रभर पेटत राहत असे आणि काळोखातही सगळीकडे उजेड होत होता.आजही काही शेतकरी आपल्या शेतातील पिके दर्जेदार व्हावीत, यासाठी गावापासून कोसो दूर जंगलात राहून शेती करतात. अशा शेतकर्यांना रात्रीच्या वेळी केरोसीन उजेडासाठी वरदान ठरत होते.तर गावांमध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर शरणासाठी उभारलेल्या लाकडांना पेट घेण्यासाठी या केरोसीनचा वापर केला जात होता.मात्र हेच केरोसीन बंद झाल्याने वाड्या वस्त्यांमधील नागरिकांचे आयुष्य लाईट गेल्यानंतर अंधकारमय झालेले आहे. यामुळे बंद झालेले केरोसीन रेशनिंग दुकानात पूर्वी सारखेच सुरू करावे अशी मागणी होत आहे..
रात्रीच्या वेळी अचानक लाईट गेली तर लाईट येईपर्यंत आम्हाला रात्र अंधारात काढावी लागते.यामुळे गरिबांच्या घरांना उजेड देणारे केरोसीन पुन्हा एकदा रेशनिंग दुकानात सुरू करावे.
– मोहन जाधव , ग्रामस्थ, डोल्हारा