घरपालघरसाहेबांसाठीच पैसे वसुली सुरू

साहेबांसाठीच पैसे वसुली सुरू

Subscribe

लाच देण्यासाठी तपासणी नाक्यावर कार्यरत खासगी इसमांकडून साहेबांसाठीच पैसे वसुली सुरू असल्याचे सांगत वाहनचालकांवर दबाव टाकण्यात येत असून प्रसंगी शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचा आरोप चालकाने केला आहे.

डहाणू:  मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी तपासणी नाक्यावर वाहनचालकांची लूट होत असून तपासणी नाक्यावरून प्रवास करणार्‍या प्रत्येक वाहनाकडून काही रक्कम एन्ट्री म्हणून वसूल केली जात असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. याविषयी एका चालकाच्या तक्रारीवरून २५ जानेवारी रोजी पुणे लाचलुचपत विभागाने सापळा रचत एका इसमाला रंगेहाथ पकडले असून तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच देण्यासाठी तपासणी नाक्यावर कार्यरत खासगी इसमांकडून साहेबांसाठीच पैसे वसुली सुरू असल्याचे सांगत वाहनचालकांवर दबाव टाकण्यात येत असून प्रसंगी शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचा आरोप चालकाने केला आहे.

दापचरी तपासणी नाक्यावर वाहनचालकांकडून वजन काट्याच्या पुढे आल्यावर मोठी वसुली केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याविषयी अकोला येथील एका वाहनचालकाने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार २५ जानेवारी रोजी सापळा रचला असता वाहनचालक आणि त्यासोबत असलेल्या दुसर्‍या वाहनाला तपासणी नाक्यावरून पुढे जाण्यासाठी एका खासगी इसमाने प्रत्येकी ३०० रुपये प्रमाणे ६०० रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

 

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित

- Advertisement -

लाचलुचपत विभागाच्या कारवाईत तपासणी नाक्यावर कार्यरत डोंबिवली येथील जयदास महादेव वायंगणकर या इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुळात शासकीय कर्मचारी या जबरी वसुलीमध्ये मोठे भागीदार असताना खासगी इसमांवर कारवाई झाल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या कारवाईत एका खासगी इसमासह अधिकार्‍यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच पुणे लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आल्यामुळे तपासणी नाक्यावरील अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -