विरारः पावसाळ्यात मिळणारी बांबूची शिंद ही रानभाजी सध्या बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी- शेतकरी महिला आठवडी बाजारात तसेच दारोदार शिंद विकून रोजगार मिळवत आहेत. पावसाची रिपरिप सुरू झाली की अनेक रानभाज्या बाजारात डोकावू लागतात. यापैकी सप्टेंबर महिन्यात येणारी रानभाजी म्हणजे बांबूच्या कोंबापासून बनवलेले शिंद सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झालेले आहे. या शिंदच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले आवडीने ही भाजी विकत घेत आहेत. बांबूला साधारण श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात कोंब येतात. हे नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात तेव्हा ते कोवळे असतात. या कोंबाला पातळ काप दिल्यानंतर तयार होते शिंद. हे बनवण्यासाठी आदल्या रात्री बाबूंच्या वरील टनक आवरणे काढून टाकतात व आतला कोवळा भाग काढून तो पाण्याने धुवून बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवतात. या प्रक्रियेत त्याला असणारा उग्र वास यामुळे कमी होतो व मऊ देखील होतो. वरील मऊ भाग कापून त्याचे लहान-लहान तुकडे एका भांड्यात झाकून ठेवले जातात. अशा पद्धतीने दुसर्या दिवशी हे शिंद भाजी करण्यासाठी तयार असतात.
राज्यात वेगवेगळ्या भागात या रानभाजी पासून खोरीसा, वास्ता, बांबूचे लोणचे अशे वेगवेगळे प्रकार करतात. पालघर जिल्ह्यातील वसई, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधव या बांबूच्या शिंद सोबतच बांबूचे लोणचे देखील तयार करतात. अनेकजण ह्यात मीठ व हळद लावून ठेवतात. कोरडे झाल्यानंतर हे मिश्रण गोठते. त्याला ’कोरडा खोरिसा’ म्हणतात. वाळलेल्या खोरिसाचा लोक वर्षभर वापर करतात. यात मासे घालून विविध पदार्थ बनवले जातात. बांबू ही खूपच तंतूमय आणि क्षारयुक्त वनस्पती आहे. यात जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ, तंतुमय पदार्थ, अॅन्टीऑक्सिडेंट तसेच विविध पोषक घटक असल्याचे सांगण्यात येते. वर्षातून एकदा मिळणारी ही रानभाजी कोणत्याही मेहनती शिवाय आपोआप उगवतात. त्यामुळे खर्या अर्थाने वर्षातून एकदाच येणारे हे सेंद्रिय अन्नच होय. अशी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असलेली शिंद म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच आहे. त्यामुळे सध्या अनेक खवय्ये हि रानभाजी विकत घेऊन याचा आस्वाद घेत आहेत.
000
वर्षाला एकदा मिळणारे बांबूचे शिंद चवीला अत्यंत रुचकर असतात. वर्षभर खाता यावे यासाठी आम्ही हे शिंद मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवतो व विविध भाज्या, डाळी, मासे, घालून यापासून अनेक पदार्थ बनवतो.
— अरुणा पाटील ( गृहिणी, विरार)
000
शहरी भागात या बांबूच्या शिंदला चांगली मागणी असल्याने भरलेली टोपली घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आम्ही विक्रीसाठी शहरात येतो. या टोपलीत 40-50 वाटे आहेत. त्यानुसार दिवसभरात 900 ते 1000 रुपये मिळतात. मात्र मोबदल्याच्या तुलनेत मेहनत अधिक घ्यावी लागते.
—आदिवासी महिला विक्रेती, सकवार
Edited By Roshan Chinchwalkar