आदिवासी समाजातील महिलांना मारहाण केल्याप्रकरणी मोर्चा

चोर समजून आदिवासी समाजातील महिलांना पोलीस चौकीत नेऊन मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करून त्याच्याविरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता.

चोर समजून आदिवासी समाजातील महिलांना पोलीस चौकीत नेऊन मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करून त्याच्याविरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. शुक्रवारी दुपारी वसईच्या पापडी येथील आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी पापडी बिट चौकीत आणले होते. त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी महिलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यानंतर वसईतील आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

डहाणू तालुक्यातील कासा परिसरातील बेबी नारायण वावरे, दिपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे या महिलांना मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. या महिला बांधकाम साईटवर मजूरीची काम करतात. वसईतील पापडी तलाव येथील कोळीवाडा येथे झोपड्या बांधून राहतात. शुक्रवारी पापडीच्या आठवडी बाजारात या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी काही जणांनी त्या चोर असल्याची माहिती बिट पोलीस चौकीत दिली. तेव्हा पोलिसांनी त्या महिलांना बिट चौकीत आणले. त्यावेळी हजर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप त्या महिलांनी केला आहे. याप्रकरणी आदिवासी संघटनांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वाघ यांची वसई पोलीस ठाण्यातून उचलबांगडी केली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षकामार्फत सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, आदिवासी महिलांना मारहाण करणार्‍या वाघ यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघटनांनी लावून धरली आहे. यामागणीसाठी गुरुवारी वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला होता. वाघ यांच्याविरोधात कडक कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – 

कळवा भागातील पाणी प्रश्न निकाली लागणार, जलवाहिनीसाठी २.४३ कोटींचा निधी मंजूर