१० मार्चला खासदार शरद पवार मोखाड्यात

मोखाड्यात शिक्षणाची वाणवा असताना तालुक्यातील मुख्यालय ते ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाचे जाळे पसरवून येथील आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहचवली. याच वेळी सुरूवातीला अतिशय कमी जागेत कमी क्षमतेच्या इमारतीला महाविद्यालय सुरू केले.

मोखाडा: खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे १० मार्च रोजी मोखाडा तालुक्यात येणार असून रयत शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या नुतन संकुलाच्या उद्घाटनासाठी पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी दिली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर या संकुलाचे तसेच उद्घाटन प्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात आमदार भुसारा यांनी पाहणी केली असून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आहे. मोखाड्यात शिक्षणाची वाणवा असताना तालुक्यातील मुख्यालय ते ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाचे जाळे पसरवून येथील आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहचवली. याच वेळी सुरूवातीला अतिशय कमी जागेत कमी क्षमतेच्या इमारतीला महाविद्यालय सुरू केले.

यावेळी तालुक्यातील बर्‍याच दानशुरानी जागा आणि बरीचशी मदत करुन हे महाविद्यालय सुरू झाले. आज याचा डोलारा उभा राहिला असून आता नवीन सुसज्ज संकुलासाठी रयत संस्थेकडून मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करून देवून खर्‍या अर्थाने आज महाविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे मोखाडावासीयांकडुन आनंद व्यक्त होत आहे.संकुलाचे बांधकाम होवून तयार झाले असून या संकुलाच्या (ईमारत) उद्घाटनासाठी दस्तरखुद्द रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याने महाविद्यालयाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार भुसारा यांनीही या इमारतीचे तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची पाहणी केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सज्ज झाला आहे. यावेळी पवार यांनी सपत्नीक यावे असा आग्रह मी केला असून आमचे आदरस्थान असलेले साहेब माझ्या तालुक्यात येत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे भुसारा यांनी सांगितले.