विरार : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसंदिवस अधिकाधिक मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यामुळे महामार्गावर तासन्तास वाहने खोळंबली जात आहेत. यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे स्थानिक नागरिक देखील वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचणे, खड्डे पडणे, वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटना अशा विविध समस्या निर्माण होत आहेत.
मंगळवारी सकाळी साडेचारच्या सुमारास कामण -नायगाव या उड्डाणपुलाच्या खालील भागात कंटेनरची ट्रकला धडक लागली. या धडकेत दुभाजक कोसळला. ट्रकही बंद पडला. त्यामुळे अहमदाबाद वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळित झाली. वाहनांची कोंडी वाढत असल्याने काही वाहनचालकांनी मुंबईच्या वाहिनीवरून विरुद्ध दिशेने वाहने काढण्यात आली. त्याचा परिणाम वसई ते ठाणे मुंबईच्या दिशेने जाणार्या वाहिनीवर झाला आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिकच जटिल बनली होती. दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यातच भर म्हणून सातीवली येथील चढणीवर अवजड मालवाहतूक करणारा ट्रक ही बंद पडला. त्यामुळे कोंडी अधिकच वाढली होती. ही समस्या आत्ता दिवसेंदिवस जटील बनू लागली आहे. वाहतूक प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही मुंबई वाहिनीवर दहा ते बारा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या जातात. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. तर दुसरीकडे शाळेला निघालेले विद्यार्थी, रुग्णांना उपचारासाठी घेऊन निघालेल्या रुग्णवाहिका यांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. तर कोंडीमुळे महामार्गालगतच्या गाव पाड्यात राहणार्या नागरिकांना दैनंदिन बाजार खरेदीसाठी बाहेर पडता आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम ही सुरू असल्याने वाहिन्या ही अरुंद आहेत त्यामुळे ही वाहने निघण्यास अडचणी निर्माण होत आहेत.