Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर पालघर भाजपच्या इशाऱ्यानंतर महापालिका आयुक्त नरमले; पालिका हद्दीत निर्बंध शिथिल

भाजपच्या इशाऱ्यानंतर महापालिका आयुक्त नरमले; पालिका हद्दीत निर्बंध शिथिल

राज्य सरकारने १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवताना काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे.

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवताना काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे. मात्र, सोमवारी कडक निर्बंध लागू करणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सूट देऊन मोठा दिलासा दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी वसई विरार महापालिका हद्द वगळता काही निर्बंध शिथिल केले आहेत. पालघर, वसई ग्रामीण, डहाणू व वाडा तालुक्यातील अत्यावश्यक सेवेच्या दुकांनासह अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने, लाँड्री, स्टेशनरी, झेरॉक्स, फुटवेअर, इलेक्ट्रिकल, हार्डवेअर, कटलरी, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फोटो स्टुडिओ, शिलाई दुकानांना सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.

मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि तलासरी या आदिवासी बहुल तालुक्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे. याभागात अत्यावश्यक आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. ही सूट सोमवार ते शुक्रवार दरम्यान असणार असून शनिवार व रविवारी कडक निर्बंध लागू असणार आहेत. दुपारी दोननंतर वैद्यकीय व इतर अत्यावश्यक बाबींसह सरकारच्या आदेशानुसार बाबी वगळता दळणवळण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कृषी विषयक दुकाने सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

 

सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाला सूट देऊन दिलासा दिला असला तरी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी मात्र कोणतीही सूट न देता पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू केले होते. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याने वसई विरार महापालिकेतील लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून वसई विरार परिसरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. ६० टक्क्यावर असलेल्या रुग्णबाधितांचा दर आता १० च्या खाली आला आहे. पण, नव्या धोरणानुसार ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे सांगत आयुक्त गंगाथरन डी. यांनी निर्बंध कायम ठेवले होते.

- Advertisement -

 

दरम्यान, मंगळवारी आयुक्तांच्या निर्बंधाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला असला तरी काही निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, महापालिका आयुक्तांनी कोणाताही दिलासा न दिल्याने भाजप आक्रमक झाली होती. लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि व्यावयासिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार शहरातील सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांना सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक आणि सरचिटणीस मनोज बारोट यांनी मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्तांची भेट देऊन दिला होता.

 

भाजपच्या इशाऱ्यानंतर आयुक्त गंगाथरन डी. यांनी दुपारी सुधारीत आदेश काढून निर्बंधातून मोठी सूट दिली. सोमवारी ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादेपेक्ष जास्त असल्याने निर्बंध लागू केल्याचे सांगणाऱ्या आयुक्तांनी मंगळवारी कोरोना चाचणी पॉझिटीव्हीटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि ऑक्सिजन बेडस ४० टक्कांपेक्षा कमी प्रमाणात भरलेले असल्याने निर्बंध शिथिल केले जात असल्याचे कारण देत नरमाईचे धोरण घेत निर्बंध शिथील करून वसईकरांना दिलासा दिला आहे. नव्या आदेशानुसार आता महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवेसह अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सलूनला परवानगी नाहीच

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जारी केलेल्या आदेशात सलून उघण्यास परवानगी दिली होती. मात्र, मंगळवारी संध्याकाळी सुधारित आदेश काढून जिल्हाधिकाऱ्यांनी सलूनची परवानगी रद्द केली आहे. राज्य सरकारने सलून, स्पा, जीम यांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही सलूनला देण्यात आली परवानगी रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisement -