अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा बुलडोझर

अतिक्रमण करणार्‍यांविरोधात पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे.

विरार : वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करणार्‍यांविरोधात पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी प्रभाग समिती एफ व प्रभाग समिती सी मधील अनधिकृत बांधकामावर पालिकेने बुलडोझर फिरवला आहे. पालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्या आदेशानुसार ’प्रभाग समिती एफ’ मधील १४ हजार चौ.फुटाचे बांधकाम, पेल्हार परिसरातील १३ हजार चौ.फूट अनधिकृत बांधकाम, वाकणपाडा येथील २१०० चौ. फुटाचे बांधकाम तसेच ’प्रभाग समिती सी’ येथील ५ हजार चौ. फुटाच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ३४ हजार ते ३५ हजार चौ. फुटाचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. यावेळी अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अजित मुठे, सहा. आयुक्त गणेश पाटील, कनिष्ठ अभियंता अतिक्रमण विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान ,अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित
होता.