पालघर: पालघर शहरात हजारो करदाते असून दर महिन्याला नगरपरिषदेमार्फत सर्व प्रभागांमध्ये एका एजन्सी मार्फत पाणी कर बिलांचे वितरण करण्यात येते. मात्र काही प्रभागांमध्ये ऑगस्टपासून तर काही प्रभागात डिसेंबरपासून पाणी बिले आलेली नाहीत. पाणी कर बिले तयार होत नसल्याने नगरपरिषदेच्या या उदासीन कार्यपद्धतीमुळे विचारणा करण्यासाठी किंवा कर भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना माघारी फिरण्याची वेळ ओढवत आहे.पाणी कर बिले दर महिन्याला आल्यानंतर ती भरणे सोप जाते. मात्र तीन चार महिन्यांचे बिल एकत्र आल्यास भुर्दंड बसेल म्हणून नगरपरिषदेने सुलभ हप्त्यात पाणी कर बिल भरण्याची मुभा नागरिकांना द्यावी अशी मागणी होत आहे. पालघरहून तीस ते चाळीस रुपये रिक्षा भाडे खर्च करून नगरपरिषद कार्यालय गाठावे लागते. त्यातच तिथे गेल्यानंतर कार्यालयातून सकारात्मक प्रतिसास न मिळाल्याने नागरिकांचा हिरमोड होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
नागरिक पाणी कर भरण्यास तयार असले तरी बिले न आल्याने त्यांच्यावर थकबाकी दिसणार आहे. त्यात वेळेत कर न भरल्यास नगरपरिषद नोटीस बजावते. मात्र बिले न पाठवल्यामुळे नगरपरिषदेने नोटिसा बजावू नये ही चूक नगरपरिषदेची आहे असे नागरिक सांगत आहेत. एकीकडे या प्रकारामुळे नागरिकांचे नियोजन खोळंबत असून दुसरीकडे बिले न पाठवल्याने कर भरणा नसल्याने नगरपरिषदेचे नुकसान होत आहे. पाणी कर बिले तयार करण्यासाठी नगरपरिषद मार्फत एका एजन्सीला ठेका दिला आहे. आय डब्ल्यू बी पी एस यांचे सॉफ्टवेअर यासाठी वापरण्यात येत आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे कर बिले तयार होत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे सहा कोटींच्या जवळपासची पाणी कर रक्कम थकीत दिसत आहे.
नगर विकास विभागाकडून प्रतिसाद नाही
या प्रकाराबाबत नगर विकास संचालक यांना पालघर नगरपरिषदेकडून वारंवार पत्र देण्यात आली असल्याचे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले आहे. अनेकवेळा पत्र व्यवहार करूनही नगर विकास विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही विभागाचे म्हणणे आहे.