वसई : गणेशोत्सव काळात होणारे प्रदूषण टाळून समाजातील बंधुभाव वाढीला लागावा, यासाठी यंदा वसई- विरार महापालिकेने एक सोसायटी एक गणपती ही संकल्पना मांडली आहे. एकाच रहिवाशी संकुलातील रहिवाशांनी आपल्या घरात स्वतंत्रपणे गणपती न आणता एकच मूर्ती आणून सामायिक गणेशोत्सव साजरा करावा, अशी ही संकल्पना आहे. ज्या इमारती ही सामायिक गणेशोत्सवाची संकल्पना राबवतील त्यांना महापालिकेकडून रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीत वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण होते. हे प्रमाण कमी व्हावे आणि समाजात बंधुता टिकून रहावी यासाठी एक सोसायटी एक गणपती ही संकल्पना मांडली आहे.
एका निवासी संकुलात अनेक जण घरगुती गणेशोत्सव साजरा करतात. परंतु तो प्रत्येकाने स्वतंत्रपणे साजरा न करता एकाच्याच घरी किंवा इमारतीच्या आवारात सार्वजनिक स्वरूपात करावा अशी ही संकल्पना आहे. यामुळे सणाचे पावित्र्य टिकून राहील, खर्चात कपात होईल आणि सर्व प्रकारचे प्रदूषण कमी होईल. ज्या इमारती हा उपक्रम राबवतील त्यांना महापालिकेतर्फे ५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.
बॉक्स
वसई- विरार महापालिकेने मागील वर्षापासून नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या आधारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. कृत्रिम तलाव, मूर्ती दान, मूर्ती संकलन, निर्माल्यापासून खत निर्मिती करणे आदी प्रयोग यशस्वीपणे राबवले होते. आता यंदा महापालिकेने ’एक सोसायटी एक गणपती’ ही संकल्पना मांडली आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेच्या धर्तीवर हा प्रयोग राबवला जाणार आहे.