HomeपालघरNalasopara Police Station: नालासोपारा शहराला लाभणार नवे पोलीस ठाणे

Nalasopara Police Station: नालासोपारा शहराला लाभणार नवे पोलीस ठाणे

Subscribe

अनधिकृत बांधकामांमुळे नवनवीन वसाहती तयार होत असून परप्रांतियांची मोठी लोकसंख्या वाढत आहे. सर्वाधिक गुन्हे याच परिसरात घडत आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कमी करून कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी नवीन पोलीस ठाण्याची गरज वाटू लागली.

वसई : नालासोपारा संतोषभवन परिसर दिवसेंदिवस गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनू लागला आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी नवी शक्कल लढवली आहे. नालासोपार्‍याच्या ‘संतोष भवन’ परिसरात नवीन पोलीस ठाणे तयार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आले आहे.

मीरा- भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात १९ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यातील सर्वाधिक गुन्हे हे नालासोपारा पूर्वेला होत असतात. नालासोपार्‍यातील संतोष भवन, बिलाल पाडा, पेल्हार, नगीनदास पाडा, प्रगती नगर आदी परिसरात लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्याचे विभाजन करून पेल्हार आणि आचोळे अशी दोन पोलीस ठाणी तयार करण्यात आली होती. परंतु गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले नाही. चालू वर्षातील ११ महिन्यात नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार पोलीस ठाण्यात ९७१ आचोळ्यात ५५० तर तुळींज पोलीस ठाण्यात ८९० गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. नालासोपारा हे शहर सर्वाधिक गर्दीचे आणि वाढत्या लोकसंख्येचे आहे. अनधिकृत बांधकामांमुळे नवनवीन वसाहती तयार होत असून परप्रांतियांची मोठी लोकसंख्या वाढत आहे. सर्वाधिक गुन्हे याच परिसरात घडत आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कमी करून कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी नवीन पोलीस ठाण्याची गरज वाटू लागली.

खारीगाव पोलीस ठाणे रद्द करणार ?

नालासोपार्‍यात नवीन पोलीस ठाणे तयार करण्यासाठी मीरा रोडमधील प्रस्तावित खारीगाव पोलीस ठाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खारीगावऐवजी संतोषभवन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मंजुरी आणि इतर तांत्रिक गोष्टींची अडचण येणार नसल्याचे सांगितले जात आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याचे विभाजन करून काशिगाव पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. त्यामुळे याच परिसरात खारीगाव या पोलीस ठाण्याची तशी गरज नसल्याचेही आयुक्त मधुकर पांडे यांनी स्पष्ट केले.


Edited By Roshan Chinchwalkar