वसईः दक्षिणेतील तामिळनाडू राज्यात नागापटिनम जवळ ख्रिस्ती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सुप्रसिद्ध वेलंकनी मातेच्या तीर्थस्थानी प्रत्येक वर्षी मोठा वार्षिक महोत्सव होत असतो. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी, तसेच वेलंकनी मातेचा नवस फेडण्यासाठी मुंबई उपनगर आणि वसई ,विरार, पालघरसोबतच संपूर्ण भारत देशातून लाखोंच्या संख्येने ख्रिस्ती, त्याचप्रमाणे अन्य धर्मिय भाविक सुद्धा जात असतात. या महोत्सवासाठी प्रत्येकवर्षी पश्चिम रेल्वेकडून वांद्रे ते वेलंकनी व मध्य रेल्वेकडुन कुर्ला ते वेलंकनी अशा स्पेशल गाड्यांची सोय करण्यात येते. मात्र दक्षिणेच्या या तीर्थस्थळी भिावकांची सोय म्हणून दक्षिण रेल्वेकडून कोणतीच सुविधा न देता, कायम उपेक्षा करण्यात आल्याचे समोर आले आहे,असा आरोप करीत, दक्षिण रेल्वेच्या असहकार धोरणामुळे यात्रेहून परणार्या भविकांना प्रचंड त्रासाला समोरे जावे लागल्याचा संताप या भविकांनी आणि वेलंकनी यात्रेकरू संघटनेने व्यक्त केला आहे.
वेलंकनी यात्रेपूर्वी प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींनी दक्षिण रेल्वेच्या संबधित वरिष्ठ अधिकार्यांना योग्यवेळी प्रत्यक्ष भेटून, वसई -विरार, पालघर तथा मुंबईतील भाविकांच्या परतीसाठी 8 सप्टेंबर रोजी वेलंकनी ते वांद्रे आणि 9 सप्टेंबर रोजी वेलंकनी ते कुर्ला अशा खास गाडीची मागणी केली असता, त्यांनी त्यास सहमती घेऊन विचार करू, असे आश्वासन दिलेले होते. मात्र परतीसाठी दक्षिण रेल्वेकडून मुंबईसाठी एकही गाडी देण्यात आली नाही. याउलट मध्य व पश्चिम रेल्वेकडून परतीच्या प्रवासासाठी पुरविण्यात आलेल्या खास दोन गाड्यांचे नियोजन करताना गोंधळ करून, 8 सप्टेंबर रोजी वेलंकनी ते वांद्रे ऐवजी कुर्ला व 9 सप्टेंबर रोजी वेलंकनी ते कुर्ला ऐवजी वांद्रेसाठी ट्रेनचे मागणीच्या उलटे नियोजन करून भाविकांची गैरसोय वाढवली, अशी तक्रार वेलंकनी यात्रेकरू संघटनेचे समन्वयक चार्ली रोझारिओ यांनी केली आहे.