भाईंदर : मीरा- भाईंदरमध्ये काशिमिरा वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नववर्षाच्या मध्यरात्री विविध ठिकाणी नाकाबंदी करत दारू पिऊन गाड्या चालविणार्या ५४ तळीरामांची नाकाबंदी दरम्यान ’ब्रेथ अॅनालायझर मशीनच्या’ साहाय्याने तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई केलेल्या आहेत. तसेच त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मीरा- भाईंदर शहरात ११ ठिकाणी आणि दहिसर चेक नाका, गोल्डन नेस्ट नाका, एस.के. स्टोन नाका, काशिमिरा नाका या ठिकाणी तपासणी करण्यात येत होती. वाहतूक शाखेमार्फत ४ पोलीस अधिकारी व ७४ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सन २०२४ या पूर्ण वर्षामध्ये एकूण २५५ ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या आहेत. तर या एकाच आठवड्यात एकूण ८३ केसेस करण्यात आल्या आहेत. तर ३१ डिसेंबरच्या रात्री ५४ तळीरामांवर कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी दिली आहे. शहरात २९ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मीरा- भाईंदर परिमंडळ -१ हद्दीतील भागामध्ये एकूण ६३ पोलीस अधिकारी, ३०० पोलीस अंमलदार, २३ सुरक्षा रक्षक आणि १ आरसीपी प्लाटून असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. दारु पिवून वाहन चालविणारे तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणारे नागरिक यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.