भाईंदर : काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डेल्टाच्या मागील सोसायटीमध्ये थर्टीफस्टच्या रात्री डीजेवर आवडती गाणीवाजवण्यावरून दोन जणांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली असून त्यात जखमी झालेल्या पैकी एकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला आहे. तर दुसरा अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून एकूण सात आरोपी असून चार जणांना ताब्यात घेतले असून 3 जणांचा शोध सुरु आहे.
काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान डेल्टा परिसरातील म्हाडाच्या इमारतीमध्ये सोसायटीमार्फत नववर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात डीजेवर आप-आपल्या आवडीची गाणी वाजवण्यावरून दोन तरुणांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यानंतर त्याच्यातील वादाने मारामारीत रूपांतर घेतले होते, लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली होती.
मयत राजा परियार याला अशिष जाधव याने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात आणि शरीरावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचा भाऊ अमित जाधव आणि त्यांचे वडिल प्रकाश जाधव आणि प्रमोद यादव यांनी परियार यास ठोश्याबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळी केली .तसेच मयत सोबत असलेल्या विपुल राय यास इतर तीन ते चार इसमांनी हातातील कड्याने तोंडावर मारहाण केल्याने त्याच्या ओठाला, उजव्या कानाला, कपाळाच्या उजव्या बाजूस व समोरील दोन दातास मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे,असे तक्रारीत म्हटले आहे.
मारामारीमध्ये जखमी झालेल्यांना पेनकरपाडा येथील पद्माकर रुग्णालयात दवाउपचारसाठी दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठविले होते. त्यातील परियार याला रुग्णालयात उपचारा सुरू असतानाच गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले असून ३ जणांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी आशिष जाधव, अमित जाधव, प्रकाश जाधव व प्रमोद यादव सह इतर अनोळखी तिन जण असे एकूण सात जणांच्या विरोधात काही जणांवर मारामारीचा गुन्हा दाखल प्रशांत पांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत करांडे हे करत आहेत.