पुढील दोन दिवस पाऊस, वीज, वार्‍याचे

त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस दुपारच्या वेळी वातावरणात थंडावा जाणवेल, अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.

पालघर : भारतीय हवामान विभागाद्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे ७ ते ९ मार्च दरम्यान राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात काही भागात विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वार्‍यासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातही ७ ते ८ मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची संभावना असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या स्थितीमुळे पुढील २-३ दिवस कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने घट होणार असून त्यानंतर क्रमश वाढ होईल. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस दुपारच्या वेळी वातावरणात थंडावा जाणवेल, अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता लक्षात घेता आंबा मोहोरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जसे मोहोर गळून जाणे, मोहोरतून बाहेर पडलेल्या छोट्या फळांची गळ होणे. नियमित पोषक फवारणी पत्रकाचा वापर केला असेल तर वरील समस्या कमी येईल. मात्र ज्या शेतकर्‍यांनी अद्याप फळधारणा झाल्यानंतरची पोषक फवारणी घेतली नाही त्या बागांवर अशा अचानक पडलेल्या वादळी पावसाने नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.फळे वाटाणा आकाराची असताना ० -५२ -३४ ची १ % ने फवारणी फळे सुपारी आकाराची झाल्यावर १३ -० -४५ ची १ % तीव्रतेची फवारणी आणि फळे अंड्याच्या आकाराची झाल्यावर वरील पैकी कोणतेही एक पोषक फवारावे. वरील प्रत्येक फवारणी मध्ये १० टक्के देशी गायी चे गोमूत्र मिसळावे, जेणेकरून आंबा फळे गळण्याचे प्रमाण कमी होईल तसेच फळांचा आकार वाढविण्यासाठी मदत होईल. तसेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर करपा रोग आणि भुरी रोग येण्याची शक्यता आहे, त्यासाठी एक टक्के कार्बनडेझिम ची फवारणी करावी. या अवकाळी पावसामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणार्‍या किडी जसे फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. परंतु हवेतील आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे करपा रोग येण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी मंन्कोझेब (M् ४५) किंवा कोपऱ ऑक्सीक्लोराइड यापैकी एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पाऊस उघडल्यावर फवारणी करावी. असा सल्ला प्रा. उत्तम सहाणे, पीक संरक्षण तज्ञ कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्याकडून देण्यात आला आहे. काढणी अवस्थेत असलेल्या हरभरा, वाल व चवळी ई. रब्बी पिकाची शेतकर्‍यांनी काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे, त्याबरोबर परिपक्व झालेला भाजीपाला, फुले व फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांच्याकडून देण्यात आला आहे.