घरपालघरअखेर नायजेरियनचे मारेकरी अटकेत

अखेर नायजेरियनचे मारेकरी अटकेत

Subscribe

नायजेरियन नागरिकाचा खून करून बांगलादेश सीमेवरून भारतातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सहा नायजेरियन आरोपींना महाराष्ट्र व मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे बेड्या ठोकण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे.

नायजेरियन नागरिकाचा खून करून बांगलादेश सीमेवरून भारतातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सहा नायजेरियन आरोपींना महाराष्ट्र व मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे बेड्या ठोकण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. नायगाव पूर्व येथील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ मे रोजी एका बंद फ्लॅटच्या मास्टर बेडरूमच्या टॉयलेटमध्ये एका ५० वर्षांच्या नायजेरियन नागरिकाचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. वालीव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करून गुन्हा दाखल करून घेतला होता. अधिक चौकशीत मृत व्यक्तीला काही नायजेरियन नागरिकांनी ३ मे रोजी नालासोपारा येथील त्याच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढून मारहाण करत चारचाकी वाहनात बसवून नेल्याचे दिसून आले होते. आजूबाजूच्या साक्षीदारांच्या जबाबातही ही हकीकत कथन करण्यात आली होती. मृतदेह सापडलेल्या नायगाव येथील फ्लॅटमध्ये राहणारे तीन नायजेरियन लोकं घर सोडून गेल्याचे समजल्याने पोलिसांचा संशय बळावला.

मृताच्या उत्तरीय तपासणीदरम्यान त्याला कठोर आणि बोथट हत्याराने मारहाण झाल्याने शरीरातील विविध अवयवांना अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मृताच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्नावस्थेत बाथरूममध्ये ठेवून रूमचा दरवाजा बंद करून आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर यांनी वालीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे बंगळुरू येथे पळून गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस बंगळुरू येथे रवाना झाले. परंतु त्यादरम्यान नायजेरियन आरोपी हे बंगळुरू येथून विमानाने गुवाहाटी येथे गेल्याचे समजले. हे आरोपी हवाईमार्गे देश सोडून जाऊ नये, याकरता लुकआऊट सेलला माहिती देण्यात आली. आरोपी हे गुवाहाटी-चेरापुंजी-शिलाँग-डावकीमार्गे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने मेघालय पोलिसांना आरोपींची माहिती देण्यात आली. त्यानुसार मेघालय पोलिसांनी सर्व आरोपींना पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.

- Advertisement -

दरम्यान, या आरोपींना कायदेशीर कारवाईकरता ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्याकरता वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार शिलाँग येथे गेले आहेत. आरोपींना शिलाँग येथील स्थानिक न्यायालयात हजर करून त्यांची सात दिवस ट्रान्झिस्ट रिमांड घेण्यात आली. नंतर त्यांना वसई येथे आणण्यात येणार आहे.

हेही वाचा –

अयोध्येच्या वादात महाराणा प्रताप सेनेची उडी, राजनंतर आदित्य ठाकरेंना नो एन्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -