घरपालघरपालघर, भिवंडीत निलेश सांबरेंचे आव्हान?

पालघर, भिवंडीत निलेश सांबरेंचे आव्हान?

Subscribe

प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असलेल्या सांबरेंनी आता जिजाऊ संघटना पक्ष म्हणून नोंदणीकृत करून थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

शशी करपेः पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरु असतानाच जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी जाहिर केली आहे. त्यानंतर त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातही जिजाऊचा उमेदवार उभा करण्याचे जाहिर करत शक्तीप्रदर्शनालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाने सर्वच पक्षांचे लक्ष वेधले आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या निलेश सांबरे यांनी विक्रमगड नगरपंचायतीची सत्ता सलग दोनदा मिळवली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवलेल्या सांबरे यांची आजही सत्तेत भागीदारी आहे. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असलेल्या सांबरेंनी आता जिजाऊ संघटना पक्ष म्हणून नोंदणीकृत करून थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

सांबरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांशी संबंध आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या कार्यक्रमाला हजेरीही लावलेली होती. मात्र, मागील अधिवेशनात प्रवीण दरेकर यांनी सांबरे यांच्या जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीविरोधात तक्रार केल्यानंतर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याशीही सांबरे यांचे पटत नाही. आपल्यावर खोटे आरोप करून चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात भाजपमधील काही नेते असल्याचे संशय सांबरे यांना वाटत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांच्याशीही त्यांचे आता जमेनासे झाले आहे. राजकीय कोंडी केली जात असल्याने आता सांबरे यांनी स्वतःच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालघरमध्येही त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आदिवासी भूमीसेनेचे काळूराम दोधडे यांनीही हजेरी लावून सांबरेंचे समर्थन केले.

- Advertisement -

दरम्यान, सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत सदस्य यांच्यासह काही ग्रामपंचायतीत सरपंचही आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी पालघर आणि ठाणे जिल्हयातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून पेरणी करायला सुरुवात केली आहे. पंधरा दिवसात दोन मेळावे घेऊन शक्तीप्रदर्शन करत सर्वच पक्षांचे लक्ष वेधले असून सांबरेंना गृहीत धरणे धोक्याचे ठरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -