घरपालघरपक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू

पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू

Subscribe

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत मेहता यांना पराभूत करणार्‍या, त्यांच्या कडव्या प्रतिस्पर्धी आमदार गीता जैन यांच्या हजेरीने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या.

भाईंदर :  भाजपमध्ये संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही. जर तो तसे कोणी म्हणत असेल किंवा वागत असेल तर त्यांना संघटनेत जागा नाही. वेळ आल्यावर त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भाईंदरमध्येच माजी आमदार नरेंद्र मेहता यांना लगावला. बावनकुळे सध्या पक्षवाढीसाठी दौर्‍यावर आहेत. रविवारी ते भाईंदरमध्ये आले होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेला आलेल्या बावनकुळे यांना मीरा – भाईंदर शहरात सध्या सुरु असलेल्या जिल्हाध्यक्ष रवी व्यास विरुध्द माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद दिसून आला. तसेच पत्रकारांनीही त्यांना याबाबतीत छेडले. त्यावेळी बावनकुळे यांनी हा इशारा दिला. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत मेहता यांना पराभूत करणार्‍या, त्यांच्या कडव्या प्रतिस्पर्धी आमदार गीता जैन यांच्या हजेरीने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या.

भाजपमध्ये कोणीही पक्षापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असेल तर वेळ आली की त्याला सर्व समजते. त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा देत पक्षाने घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असतो. पक्षाने रवी व्यास यांना जिल्हा अध्यक्ष बनवले असून पक्ष त्यांच्यासोबत नेहमी असणार असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट करत नरेंद्र मेहतांना चांगलेच फटकारले. पक्षात गटबाजीच्या तक्रारी आल्या असून सर्वांना विश्वासात घेऊन त्या सोडवण्यात येतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले. मीरा -भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार असून विरोधकांच्या हाती काहीच लागणार नाही. इतर पक्षातून आलेल्यांनाही महापालिकेच्या निवडणुकीत संधी दिली जाईल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात शहरातील अनेक विकास कामे थकलेली आहेत. आता शहराच्या विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकू

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक तर विधानसभेच्या भाजप व शिंदे यांची शिवसेना मिळून २०० हून अधिक जागा जिंकू. पुढच्या काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहेत. त्यामुळे राजकारणात धक्कादायक स्फोट होणार आहे. येणार्‍या काळात भाजपची ताकद इतकी वाढेल की महाविकास आघाडीला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवार मिळणे देखील कठीण जाईल, असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष रवी व्यास, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, प्रवक्ते गजेंद्र भंडारी यांच्यासह मीरा भाईंदरमधील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -