जलजीवन मिशनसाठी अडथळ्यांची शर्यत

जर प्रशासनाने योग्य पाऊले उचलून जेथे-जेथे जागेच्या समस्या सोडवल्यास या योजनांची कामे लवकर पूर्ण होऊन मार्च - एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाई नक्कीच थांबवू शकतो.

विक्रमगडः ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येनुसार २०२४ पर्यंत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी जल जीवन मिशन ही योजना अंमलात आणली असून २०२४ पर्यंत प्रत्येक घरात मुबलक पाणी देण्याचा त्यांचा मानस आहे. २० पेक्षा जास्त कुटुंबे असलेल्या वसाहतीमध्ये देखील योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात ५६२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, अनेक गावांमध्ये टाकी आणि विहिरींना लागणार्‍या जागेच्या समस्या निर्माण झाल्याने कामांना विलंब होऊ लागला आहे. खाजगी जागा मालक पाण्याची पाईपलाईन आपल्या जागेतून नेण्यासाठी आडकाठी करत असल्यामुळे या कामांना विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना अर्धा संपला असून मार्चपासून अनेक गावपाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जर प्रशासनाने योग्य पाऊले उचलून जेथे-जेथे जागेच्या समस्या सोडवल्यास या योजनांची कामे लवकर पूर्ण होऊन मार्च – एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाई नक्कीच थांबवू शकतो.

विरोध करणार्‍यांवर कारवाईची मागणी

पाड्यांवर गोरगरीब आदिवासी समाज राहत आहे. आजही बहुतांश पाड्यांना पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. या आदिवासी महिलांना मोलमजुरी करून काही किलोमीटर अंतरावरून पाणी डोक्यावरून वाहावे लागते. जलजीवन मिशनच्या माध्यमातून नक्कीच या महिलांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. पाईपलाईन नेण्यासाठी जागा मालकांचा विरोध जास्त प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे या योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने तात्काळ जमिनीच्या तीन फूट जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यास विरोध करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.