घरपालघरशिक्षण सहसंचालकाचे कार्यालय पनवेलला,कॉलेजांची गैरसोय

शिक्षण सहसंचालकाचे कार्यालय पनवेलला,कॉलेजांची गैरसोय

Subscribe

ठाणे आणि पालघर जिल्हयातून पनेवल येथील सहसंचालक कार्यालयात जाणे येणे हे आर्थिकदृष्ट्या खर्चिक, वेळेचा अपव्यय करणारे तसेच महिला कर्मचार्‍यांसाठी गैरसोयीचे आहे.

वसईः पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कॉलेजना शिक्षण विभागाशी कामकाजासाठी आता पनवेल येथील शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याने पूर्वीप्रमाणेच मुंबई विभागाच्या सहसंचालकांकडे कार्यभार सोपवल्यास कॉलेजांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या कोकणातील सहा जिल्हयांमध्ये कार्यरत असलेल्या अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांचा कार्यभार सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण, मुंबई विभाग सांभाळत होते. कोकणातील महाविद्यालयांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी नविन सहसंचालक कार्यालय, कोकण विभाग, पनवेल येथे सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोकण विभागीय कार्यालयात ठाणे व पालघर जिल्हयातील सर्व पदवी महाविद्यालये वर्ग करण्यात आलेली आहेत. ठाणे आणि पालघर जिल्हयातून पनेवल येथील सहसंचालक कार्यालयात जाणे येणे हे आर्थिकदृष्ट्या खर्चिक, वेळेचा अपव्यय करणारे तसेच महिला कर्मचार्‍यांसाठी गैरसोयीचे आहे.

ठाणे व पालघर जिल्हयात जवळपास ४० महाविद्यालये आहेत. यात पालघर जिल्हयातील जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा, तलासरी, डहाणू ,बोईसर,पालघर, वसई- विरार तसेच ठाणे जिल्ह्यातील मीरा- भाईंदरसह अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे. पूर्वी या सर्व महाविद्यालयांना पश्चिम रेल्वेने सहसंचालक कार्यालय, मुंबई येथे जाण्यासाठी कमी अंतर असल्याने सोयीचे होते. त्याचवेळी मुंबईला सहसंचालक कार्यालयाबरोबरच संचालक व्यवसाय प्रशिक्षण, उपशिक्षण संचालक कार्यालय, मुंबई विद्यापीठ, सहसंचालक तंत्र शिक्षण कार्यालय, महालेखापाल कार्यालय, न्यायालय अशी कार्यालये जवळपास असल्याने एका फेरीत अनेक कामे करता येत होती. महाविद्यालयाच्या अनेक कामाचा पाठपुरावा एकाच दिवशी करता येत होता. परंतु नवनिर्मित कोकण विभागाच्या पनवेल येथील कार्यालयात किमान शंभर ते दीडशे किलोमीटरचे अंतर पार करून जावे लागते. तेही एका कामासाठी. याठिकाणी जाणे येणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक, वेळेचा अपव्यय करणारे तसेच महिला कर्मचार्‍यांसाठी गैरसोयीचे आहे.

- Advertisement -

ही बाब आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह आमदार क्षितीज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून देत दोन्ही जिल्हयातील कॉलेजचा मुंबई विभागात समावेश करण्याची मागणी आमदारांनी केली. मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यातून लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन पाटील यांनी आमदारांना यावेळी दिले.

०००

- Advertisement -

ठाणे आणि पालघरमधील महाविद्यालयीन कर्मचार्‍यांना पनवेल खूप लांब पडत आहे. एकाच कामासाठी त्याठिकाणी जावे लागत आहे. इतर कामासाठी पुन्हा मुंबईला जावे लागते. पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या तलासरी,मोखाडा येथील महाविद्यालयांना तसेच वसई – विरार , मीरा भाईंदर येथील महाविद्यालयांनाही पनवेल सोईस्कर नाही. पूर्वीप्रमाणे ठाणे आणि पालघरमधील महाविद्यालयांना मुंबईला जोडल्यास रेल्वेमुळे त्यांची कामे एकाच फेरीत होऊ शकणार आहेत.

— संजीव पाटील , विश्वस्त, विवा महाविद्यालय (विरार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -