घर पालघर मालमत्ता करापोटीचे दीड लाख रुपये परस्पर लांबवले

मालमत्ता करापोटीचे दीड लाख रुपये परस्पर लांबवले

Subscribe

ही कारवाई टाळण्याकरता मालमत्ताधारक रवींद्र दुडुगू यांनी महापालिकेचा तत्कालिन मालमत्ता कर वसुली कर्मचारी दुर्मिल किणी याला 1 लाख ४० हजार रुपयांचा धनादेश देऊन करापोटीची रक्कम तात्काळ भरण्याची विनंती केली होती.

वसईः मालमत्ता कर भरण्यासाठी दिलेले दीड लाख रुपये वसई-विरार महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील कर्मचार्‍याने परस्पर लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिका व पोलिसात तक्रार देऊनही संबंधित कर्मचार्‍याविरोधात कार्यवाही करण्यात आलेली नाही. शिवाय कर्मचार्‍याने लांबवलेले पैसे परत मिळवून देण्याकरता महापालिका सहकार्य करत नसल्याची तक्रार मालमत्ताधारकाने केली आहे. वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘बअंतर्गत येणार्‍या विरार येथील मनवेल पाडा येथील सिद्धीविनायक अपार्टमेंटमधील चार रूमच्या थकित कराच्या वसुलीकरता महापालिकेने २०२० मध्ये मालमत्ताधारक रवींद्र दुडुगू यांना नोटीस बजावली होती. देय मुदतीत कर भरणा न केल्याने या मालमत्तांना सील ठोकण्याचे निर्देश महापालिकेने कर्मचार्‍यांना दिले होते. ही कारवाई टाळण्याकरता मालमत्ताधारक रवींद्र दुडुगू यांनी महापालिकेचा तत्कालिन मालमत्ता कर वसुली कर्मचारी दुर्मिल किणी याला 1 लाख ४० हजार रुपयांचा धनादेश देऊन करापोटीची रक्कम तात्काळ भरण्याची विनंती केली होती.

महापालिकेच्या संभावित कारवाईमुळे भांबावलेल्या व घाबरलेल्या रवींद्र दुडुगू यांनी सदर धनादेशावर महापालिकेचा नामोल्लेख केला नव्हता. मालमत्ताधारकाच्या याच चुकीचा गैरफायदा घेत दुर्मिल किणी यांनी हा धनादेश मितेश नारायण बने यांच्या खात्यातून वटवला. मात्र मालमत्ताधारक रवींद्र दुडुगू यांच्या थकित कराचा भरणा केला नाही. परिणामी दुडूगू यांच्या मालमत्तांना महापालिकेने सील ठोकले. याबाबत विचारणा करता लवकरच कर भरणा करणार असल्याचे रवींद्र दुडुगू यांना दुर्मिल किणी याने सांगितले होते. महिनोमहिने उलटले तरी हा कर भरणा न झाल्याने व पैसेही परत मिळत नसल्याने दुडूगू यांनी अखेर महापालिका उपायुक्त समीर भूमकर यांच्याकडे व पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दरम्यानच्या काळात थकित कर भरणा करून रवींद्र दुडुगू यांनी तीन रूमचे सील महापालिकेकडून काढून घेतले. पण महापालिका स्तरावर याबाबतचा पाठपुरावा कायम ठेवला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही महापालिका अथवा पोलीस कोणतीच कार्यवाही करत नसल्याचे रवींद्र दुडूगू यांचे म्हणणे आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे व चोरीचे बिंग फुटल्याने दुर्मिल किणी यांनी अन्य नावाच्या धनादेशाद्वारे दुडूगू यांचा मालमत्ता कर भरणा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा धनादेश न वटल्याचे रवींद्र दुडुगू यांना महापालिकेने कळवले होते. हा धनादेश कुणाच्या नावे दिला गेला, याची विचारणा करता महापालिकेतील कर्मचार्‍याने ही माहिती देण्यास नकार दिल्याचे दुडूगू यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मालमत्ताधारकाचे पैसे परत देण्याचे आश्वासन उपायुक्त समीर भूमकर यांच्या समक्ष महापालिका कर्मचारी दुर्मिल किणी याने दिलेले आहे. मात्र, आजपर्यंत हे पैसे परत मिळालेले नसल्याची खंत दुडुगू यांची आहे. त्यामुळे दुर्मिल किणी याच्याविरोधात कडक कारवाई करून आपले पैस परत मिळवून देण्यात यावेत, अशी विनंती दुडूगू यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. दुडूगू यांच्या तक्रारीनंतर महापालिकेने पैसे परत करण्याचे लेखी आदेश किणीला दिले आहेत. विशेष म्हणजे या आधी वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सीच्या घरपट्टी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी सामान्य नागरिकांनी कर स्वरूपात भरलेल्या लाखो रुपयांची हेराफेरी केलेली आहे. शिवाय महापालिकेच्या विविध प्रभागांतून बनावट पावती देऊन कोट्यवधी रुपयांचा ‘घरपट्टी घोटाळा केल्याचेही समोर आलेले आहे. या कर घोटाळ्यावर अधिवेशनातही वादळी चर्चा झडलेली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -