पालघर: पालघर येथील आसिफ घाची हा तरुण बदली ड्रॉइव्हर म्हणून प्रवाश्यांना १२ ऑगस्ट रोजी नाशिक येथे सोडायला गेला असताना त्याची मोखाड्याच्या मोरचंडी घाटात सदर प्रवाश्यांकडून हत्या करण्यात आली होती.तसेच हत्या केल्यानंतर मारुती अर्टिगा कार चोरून नेण्यात आली होती. आता या प्रकरणातील तीन पैकी एका मारेकर्याला अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.तसेच चोरी करण्यात आलेली मारुती अर्टिगा कार देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी माहिती देताना सांगितले की, आसिफ घाची याची हत्या करून भाडे तत्वावर घेतलेले वाहन घेऊन पसार झालेल्या तीन मारेकर्यांपैकी एकाला ओडिशा येथे पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीला गेलेली कार देखील हस्तगत करण्यात आली आहे. पालघर पोलिसांची सहा वेगवेगळे पथके या प्रकरणाचा तपास करत असून त्यापैकी एका पथकाला यात यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या मारेकर्याला तसेच वाहनाला ओडिशातून पालघर येथे आणण्यात येणार असून बाकीचे दोन मारेकरी यांनी देखील लवकरच अटक करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
शिवसेनेकडून आर्थिक मदत
आसिफ याच्या पश्चात पत्नी, ४ वर्षाचा मुलगा, भाऊ व आई – वडील असा परिवार आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकार्यांनी आसिफच्या परिवाराची भेट घेऊन त्याचे सांत्वन केले व शिवसेना त्यांच्या कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभे राहील, याची ग्वाही दिली. तसेच या प्रसंगात आसिफ घाची यांच्या मुलांकरिता जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी काही प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेचे पालघर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रईस खान यांनी आसिफ यांच्या मुलाच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, युवा शहराध्यक्ष नैवेद्य संखे, शहर उपाध्यक्ष प्रफुल पाटील उपस्थित होते.