दीपक खांबित गोळीबारप्रकरणी उत्तर प्रदेशातून एकाला अटक

मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंत्या दीपक खांबित यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातून एकाला अटक करून तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंत्या दीपक खांबित यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातून एकाला अटक करून तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अमित सिन्हा असे त्याचे नाव आहे. या हल्लेखोराच्या अटकेनंतर आता या हल्ल्यामागील मूख्य सूत्रधार हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी २९ सप्टेंबरच्या सायंकाळी खांबित आपल्या गाडीतून बोरीवली येथील राहत्या घरी जात असताना बोरीवली पूर्वेकडील नॅशनल पार्क येथील कृष्णा इमारतीसमोर दुचाकीवरून पाठलगा करत असलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले होते. या हल्ल्यात खांबित सुदैवाने बचावले. हल्ल्यात दरवाजाच्या काचा फुटल्याने त्यांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या होत्या.

खांबित गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अमित सिन्हाला अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईच्या कस्तुरबा पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. याप्रकरणी पुढील तपास अजून सुरू आहे.
– डॉ. महेश पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा

याप्रकरणी बोरीवली येथील कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखादेखिल याप्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना हल्लेखोर मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयाबाहेर दुचाकीवर पाळत ठेऊन असल्याचे दिसून आले होते. रेनकोट घातलेले हल्लेखोर खांबीत यांच्या गाडीचा दुचाकीवरूनच पाठलाग करत निघाले होते. नॅशनल पार्क परिसरात संधी साधून हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून हायवेवरून वसई-विरारच्या दिशेने पळून गेले होते.
खांबीत यांचे कॉल डिटेल्स काढून त्या आधारेसुद्धा तपास सुरू केला होता. त्यात टेंडर वाद, पूर्ववैमनस्य, हेवेदावे, मालमत्तेचा वाद यासह राजकीय संबंध या सर्वच कारणांच्या शक्यता मुंबई पोलीस तपासत आहेत. दुसरीकडे मीरा भाईंदर,वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील यांचे पथक खांबीत हल्लाप्रकरणी कसून तपास करत होते. त्यांच्याकडूनही विविध शक्यता पडताळून पाहिली जात आहे. महेश पाटील यांच्या पथकाला या गुन्ह्यात पहिले यश मिळाले आहे. पाटील यांच्या पथकाने रविवारी उत्तरप्रदेशातून अमित सिन्हा नावाच्या हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्यानंतर विमानाने आणून अमित सिन्हाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हल्लेखोर अमित सिन्हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीसुद्धा गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये होता. त्याला पैशांची गरज होती म्हणून सुपारी घेऊन हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्याचे नेमके कारण टेंडर वाद की अन्य काही, हे पोलिसांच्या चौकशीतून निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –

दोन महिन्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी कोल्हापुरात, शेतकऱ्यांकडून जोरदार निषेध