वाडा : कांद्याचे उत्पादन घटल्याने पुढील काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काळात कांद्याची मागणी वाढल्यास कांद्याला चांगला दर मिळेल. सरकारच्या धोरणावर मेहनतीचे सोने होणार की माती होणार हे ठरणार आहे. यामुळे शेतकरी आता कांदा लागवड करण्याच्या तयारीत आहेत. यातून शेतकर्यांनी कांदा रोपाची पाहणी केली आहे. मात्र, कांद्याचे रोपच बाजारात उपलब्ध नसल्याने कांदा बी फेकून शेतकर्यांना लागवड करावी लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकर्यांनी उपायोजना सुरू केल्या आहेत.15 डिसेंबरपर्यंत कांद्याची लागवड करण्यात येते. त्यामुळे यावर्षी कांदा लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
कांद्याची लागवड करताना एका एकराला अडीच किलो बी लागते. कांद्याचे बी 700 ते 900 रुपये किलो आहे. तर पांढर्या कांद्याचे बी एक हजार ते बाराशे रुपये किलो आहे. रूपाचे दर त्यापेक्षा जास्त आहेत. एक सरी दोन हजार रुपयांना विकली जाते. एका एकराला दहा ते बारा सर्यांचे रोप लागते. शेतकर्यांनी रोप तयार करण्यासाठी वाफे तयार केले. मात्र, बदलत्या हवामानाने ही रोपे तयारच झाली नाहीत. याचा फटका कांद्याच्या रूपांना बसला. यातूनही कांद्याच्या रोपांचे दर वाढले आहेत. हे दर शेतकर्यांच्या आवाक्याच्या आता बाहेर आहेत.
कांद्याचा एकूण खर्च मोठा आहे. त्या तुलनेत मिळणारा दर नगण्य आहे. कांद्याला 25 रुपये किलोच्या वर दर असेल तरच शेतकर्यांना ते फायद्याचे ठरते.
-सुरेश भोईर , शेतकरी
Edited By Roshan Chinchwalkar