घरपालघरऑनलाईन महासभेत मतदान घोटाळा; नगरसेविकेचा भाजपला घरचा आहेर

ऑनलाईन महासभेत मतदान घोटाळा; नगरसेविकेचा भाजपला घरचा आहेर

Subscribe

मीरा भाईंदरच्या ऑनलाईन महासभेत नगरसचिवांना हाताशी धरून भाजपकडून मतदान घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी करून शिरवळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

मीरा भाईंदरच्या ऑनलाईन महासभेत नगरसचिवांना हाताशी धरून भाजपकडून मतदान घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी करून शिरवळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. तसेच गेल्या महासभेत पारित झालेला परिवहनचा ठराव रद्द करण्याची मागणीही त्यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.

मीरा भाईंदर महापालिकेची महासभा ऑनलाईन चालत असली तरी या ऑनलाईन महासभेत मतदान मोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवक करीत असताना भाजपच्या नगरसेविका सोन्स सत्ताधारी भाजपविरोधात आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मागीलवेळी तहकूब झालेली ऑनलाईन महासभा बुधवारी घेण्यात आली. यावेळी भाजपाच्या ध्रुवकिशोर पाटील यांनी परिवहन सेवेबाबतचा ठराव मांडला होता. परिवहन सेवेसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यावर कमिटी गठीत करण्यात यावी, अशी मागणी ठरावात होती. त्यावर सर्व सदस्यांना यावर चर्चा करायला मिळावी आणि महासभेत रीतसर ठराव आणावा, असा ठराव भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी मांडला होता. त्याला भाजपच्या दौलत गजरे यांनी अनुमोदन दिले होते.

- Advertisement -

आमदार तथा नगरसेविका गीता जैन यांच्यासह शिवसेनेने सोन्स यांच्या ठरावाला समर्थन दिले होते. त्यामुळे ऑनलाईन महासभेत मतमोजणी घेण्याची पाळी येताच भाजप गटनेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकानुसार मतदान धरावे, असा अजब प्रकार सुरू केला. त्याला आक्षेप घेत भाजपतीलच काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करून प्रत्यक्ष उपस्थितीप्रमाणे मतदान घ्या, अशी मागणी केली. आश्चर्य म्हणजे मतदान प्रक्रिया सुरू असतानाच महापौर ज्योत्स्ना हसनाळे काही काळासाठी उठून निघून गेल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ आयुक्त दिलीप ढोले, सचिव वासुदेव शिरवळकर आदी सुद्धा उठले.

स्क्रिनवर हजर असलेल्या नगरसेवकांची संख्या सांगा, अशी मागणी सेनेच्या गटनेत्या नीलम ढवण आदींनी करून सुद्धा सचिव वासुदेव शिरवळकर यांनी टाळाटाळ केली. मतदानाचा मुद्दा येताच सत्ताधारी भाजपातील माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थकांची धावपळ उडाली. नगरसेवकांना निरोप दिले गेले, असे सूत्रांनी सांगितले. या ठरावावर भाजपामध्ये दुफळी पडल्याने मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले. सचिवांनी नंतर मात्र भाजपच्या पाटील यांच्या ठरावाच्या बाजूने ४२, भाजपच्याच सोन्स यांच्या बाजूने भाजपाच्या काही तर सेनेच्या नगरसेवकांची मिळून ३१ मते पडल्याचे जाहीर केले. तर काँग्रेसचे ७ नगरसेवक तटस्थ राहिल्याचे सचिव म्हणाले.

- Advertisement -

नगर सचिव शिरवळकर यांच्याकडे पक्षनिहाय उपस्थित नगरसेवकांची संख्या विचारली असता त्यांनी भाजपचे ५९, सेनेचे १४ तर काँग्रेसचे ७ असे एकूण ८० नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती दिली. परंतु ऑनलाईन महासभेत मतदान प्रक्रिया आणि मोजणी दरम्यान घोटाळा झाला असून सचिवांनी पूर्वी प्रमाणेच सत्ताधाऱ्यांच्या एका वादग्रस्त नेत्याची तळी उचलण्याचे काम चालवले आहे असा आरोप सेनेच्या गटनेत्या ढवण यांनी केला. नियमानुसार मतदानावेळी महासभेला जे हजर असतात त्यांनाच मतदान करता येते. तसेच प्रत्येक नगरसेवकाचे मत नोंदवले जाते. ऑनलाईन महासभेचा सत्ताधारी हे सचिवांच्या संगनमताने गैरफायदा घेऊन गटनेत्यांच्या सांगण्यानुसार मतदान नोंदवतात.

धक्कादायक बाब म्हणजे बुधवारच्या महासभेवेळी काही नगरसेवक ऑनलाईन प्रत्यक्ष हजर नसतानासुद्धा त्यांचे फोनद्वारे असंवैधानिक पद्धतीने मतदान घेण्यात आले. हे नियमाबाह्य आहे. मतदान घेताना फक्त ऑनलाईन असलेल्या सदस्यांनाच मतदान करण्याचां अधिकार असतो. महापौर मतदान प्रक्रिया सुरु असताना काही मिनिटांसाठी उठून गेल्या होत्या. त्याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना त्यांच्या समर्थक नगरसेवकांना बोलावण्याची संधी साधण्यात आली असा आरोप करून ढवण यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तर नीला सोन्स यांनी नगरसचिव शिरवळकर यांच्यावर कठोर कारवाई करून त्या ठिकाणी दुसरा अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा –

Weather Alert: पुणे, सातारा, नाशिक भागात पावसाची शक्यता – IMD

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -