वसईः मानवी जीवनातील व्यथा, वेदना, यांना शब्दांतून साकार करणारे साहित्यच खर्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे कार्य करू शकते. साहित्याच्या अभिव्यक्तीतूनच समाजाचे खरे रूप आपल्यासमोर येते आणि आपल्यातला हा साहित्यिक नियमित वाचन व चिंतनातूनच घडत असतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. आत्माराम गोडबोले यांनी केले. ते वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ’मराठी भाषा गौरवदिन’ समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मराठी विभाग आणि मराठी वाङ्मयमंडळाने आयोजित केलेला हा समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मराठी भाषा चांगली बोलता, लिहिता, वाचता येणारा प्रत्येक विद्यार्थी कोणत्याही प्रदेशातील कोणत्याही भाषेला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थीसुद्धा भाषेच्या चांगल्या ज्ञानाने आणि साहित्याच्या वाचनाने स्वतःमधील आत्मविश्वास उंचावू शकतो, असे मत डॉ. अरविंद उबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. यावेळी श्रुती पवार या विद्यार्थिनीने कविवर्य कुसुमाग्रज यांचे जीवनकार्य आणि त्यांच्या साहित्यसंपदेविषयी परिचय विद्यार्थांना माहिती दिली. पुजा फरकले या विद्यार्थिनीने प्रातिनिधीक स्वरूपात कुसुमाग्रज यांची ’अखेर कमाई’ ही कविता सादर केली.
अनंता जाधव या विद्यार्थ्याने ’मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले तर युक्ता शेलार या विद्यार्थीनीने सुरेश भट यांचे ’लाभले आम्हास भाग्य’ हे मराठी अभिमानगीत सादर केले. प्रा. आत्माराम गोडबोले यांचा परिचय सिन डिक्रूझ या विद्यार्थीनीने करून दिला. १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन, कथालेखन, निबंधलेखन आणि उतारा अभिवाचन या स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. आत्माराम गोडबोले यांनी मराठी विभागाला कविवर्य कुसूमाग्रजांची प्रतिमा भेट दिली. मराठी विभागप्रमुख डॉ. शत्रुघ्न फड, डॉ. सखाराम डाखोरे, प्रा. शैलेश औटी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. निवडणूक साक्षरता मंडळासाठी कार्यरत असणारे महापालिकेचे उद्यान विभागाचे अधीक्षक मानकर यांच्यासह वसई विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावेळी उपस्थित राहून नवमतदार प्रशिक्षण आणि नावनोंदणी अभियानाची माहिती दिली आणि ’जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी मतदारयादीत आपली नावे नोंदवावीत’ असे आवाहनही केले. तसेच नवमतदार जागृतीच्या दृष्टीने चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि निबंध अशा काही स्पर्धांचीही घोषणा यावेळी करण्यात आली.