Eco friendly bappa Competition
घर पालघर पेसा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

पेसा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

Subscribe

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि शिक्षक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

पालघरः वित्त विभागाने शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करण्यास परवानगी दिली असून त्यातील ८० टक्के पदे अनुसूनित जमाती-पेसा क्षेत्रातून भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक १ हजार ६०० शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती करताना पेसा कायद्यानुसार स्थानिक आदिवासी समाजातील शिक्षकांसाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी केल्या अनेक महिन्यांपासून करण्यात आली होती. त्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आंदोलनेही केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि शिक्षक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

या मागणीला यश आले असून टीएआयटी-२०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची आपल्या जिल्हयातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त, आयुक्तालय पुणे यांनी जिल्हा परिषदेस दिले आहेत. त्यानुसार टीएआयटीची यादी प्राप्त झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात यावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असून तब्बल १६०० स्थानिक शिक्षक रिक्त पदी भरले जाणार आहेत. जिल्ह्यात शिक्षकांची ७ हजार १०८ पदे मंजूर असून ४ हजार ९३० शिक्षक कार्यरत आहेत. २ हजार १७८ इतकी पदे रिक्त असून मराठी माध्यमाचे २ हजार ६५, उर्दू माध्यमाच्या ७३, गुजराती माध्यमाच्या २९ तर हिंदी माध्यमाच्या ११ जागा रिक्त आहेत.

- Advertisement -

१ हजार ६०० शिक्षक जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील भरती होऊन येत असून सर्वप्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी व कमी शिक्षक असलेल्या शाळा असे प्राधान्यानुसार शिक्षक भरती केली जाईल. सर्व शिक्षक हे स्थानिक असल्याने पुढे जिल्हा बदलीमुळे जागा रिक्त होणार नाहीत.

— प्रकाश निकम

- Advertisement -

अध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर

- Advertisment -