कोळंबी प्रकल्पास पुन्हा जागा देण्यास चिंचणी ग्रामस्थांचा विरोध

त्यामुळे पुन्हा कोळंबी प्रकल्पास जागा मंजूर करण्यास नागरिकांनी विरोध करून पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

बोईसर: भाडेपट्टा संपलेल्या कोळंबी प्रकल्पास पुन्हा जागा देण्यास चिंचणी ग्रामस्थांनी विरोध केला आहे.कोळंबी प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी देण्यात येऊ नये तसेच जागेचा रितसर ताबा घेण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील गट क्र.२४७५/१२ मधील ५.००.० हे.आर.जमीन ही जगन्नाथ गानू वझे यांना ३० वर्षांपूर्वी कोळंबी प्रकल्पाकरीता भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती.३० वर्षांचा कालावधी संपल्यानंतर ही जमीन पुन्हा शासनजमा करण्यात आली आहे.या कोळंबी प्रकल्पामुळे चिंचणी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.त्यामुळे पुन्हा कोळंबी प्रकल्पास जागा मंजूर करण्यास नागरिकांनी विरोध करून पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

चिंचणी येथील जगन्नाथ वझे यांचा कोळंबी प्रकल्प हा मांगेलवाडा,बारीवाडा आणि मोरीपाडा या गावठाण क्षेत्राला अगदी लागून आहे.या कोळंबी प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीची परवानगी सुद्धा घेण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्याचप्रमाणे या कोळंबी प्रकल्पासाठी गावातील सांडपाणी व नैसर्गिक नाल्याची दिशा बेकायदेशीररीत्या नागरी वस्तीमध्ये वळविल्यामुळे गावातील सांडपाणी तुंबून कोळंबी प्रकल्पालगत राहत असलेल्या गावातील ८०० नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांनी केला आहे.