रहिवासी भागात आरएमसी प्लांटला विरोध

मिरा भाईंदरमधील नागरी वस्तीतील आरएमसी प्लांट बाहेर हलवण्याचे आश्वासन दिल्यानंतर महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिलेल्या पेणकरपाडा भागातील आरएमसी प्लांट हलवण्याच्या मागणीकरता स्थानिक नागरिक, नगरसेवक आक्रमक झाले आहेत.

आरएमसी प्लांट (प्रातिनिधीक फोटो)

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधी मंडळाच्या अधिवेशनात मिरा भाईंदरमधील नागरी वस्तीतील आरएमसी प्लांट बाहेर हलवण्याचे आश्वासन दिल्यानंतर महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिलेल्या पेणकरपाडा भागातील आरएमसी प्लांट हलवण्याच्या मागणीकरता स्थानिक नागरिक, नगरसेवक आक्रमक झाले आहेत. सृष्टी सेक्टर २ येथे महापालिकेने १० मार्च २०२१ रोजी ६८ हजार चौ.मी. जागेवर बांधकाम परवानगी दिली आहे. त्याचबरोबर महापालिकेने रहिवासी क्षेत्राच्यालगतच रेडिमिक्स काँक्रीट प्लांटला परवानगी दिली आहे. प्लांट पर्यावरणास हानीकारक असून जनतेच्या आरोगाच्या प्रश्न निर्माण होण्याची भिती व्यक्त करून हा प्लांट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्लांट सुरु असलेल्या जागेवर पूर्वी कांदळवन होते. त्यामुळे हे क्षेत्र सीआरझेड बाधित आहे. याठिकाणी ५० मीटर परिसरात कुठलेही बांधकाम करता येत नाही. असे असताना मिरा भाईंदर महापालिकेने आरएमसी प्लांटला दिलेली परवानगी दिलेली आहे. त्यामुळे महापालिकेने परवानगी रद्द करून प्लांट शहराबाहेर हलवावा, अशी आमची मागणी आहे.
– राजू भोईर, नगरसेवक

शहरानजिक असलेल्या पेणकरपाडा गावामध्ये या प्लांटमुळे लहान मुलांना-ज्येष्ठांना दमा, डोळ्यांचे आजार होत आहेत. तर रेडिमिक्सच्या प्रकल्पामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. महापालिकेने बांधकाम प्रकल्पासाठी आरएमसी प्लांट सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानेही नाहरकत दाखला दिला आहे. त्याला स्थानिक नगरसेवक राजू भोईर, भावना भोईर, परशुराम म्हात्रे आदींनी विरोध करून प्लांट बंद करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – 

आव्हाडांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला – भुजबळ