भाईंदर :- मीरा –भाईंदर शहरात गणेशोत्सव नियोजनपूर्ण साजरा करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्तांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्व गणेश मंडळांना आवाहन केले.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी, गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागनिहाय कार्यालयात यावर्षीसुद्धा एक खिडकी योजना सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या एक खिडकी योजनेत संबंधित प्रभागातील सर्व गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिका, पोलीस प्रशासन, पोलीस वाहतूक प्रशासन तसेच अग्निशमन दल यांच्याकडून विनामूल्य परवानगी देण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांनी रस्त्यावर मंडप बांधताना नियमात दिलेल्या मंडपाच्या आकाराएवढेच मंडप रस्त्यावर बांधण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
तसेच मंडप बांधताना रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे खड्डे करू नये, असे सक्तीचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले आहेत. सार्वजनिक मंडळांना दहीहंडी तसेच गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर कमानी बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप परवानगीसाठी संबंधित प्रभाग कार्यालयात परवानगी अर्ज देऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त यांनी केले आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडप व रस्त्यावर होणार्या विद्युत रोषणाईसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयाशी संपर्क साधून व मंडळांनी त्यांना अर्ज देऊन तात्पुरत्या स्वरूपात मीटर उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी, गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
मूर्ती स्वीकृती केंद्र तयार
महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मूर्ती स्वीकृती केंद्र तयार करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी येणार्या नागरिकांसाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल पर्यावरण मित्र म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, तसेच नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास देखील सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी केले आहे.