वाडा : तालुक्यातील शेतकर्यांची धानाची खरेदी- विक्री आदिवासी विकास विभागामार्फत केली जाते. या केंद्रांचे उद्घाटन शनिवार(दि.१४) रोजी आमदारांच्या उपस्थितीत पार पडले. उद्घाटन होऊन दहा दिवस लाटले तरी या धान खरेदी विक्री केंद्रावर अजून भाताची खरेदी सुरू झालेली नाही. शिवाय बारदानही उपलब्ध नसल्याने शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. बारदानशिवाय भात विक्री केंद्रावर भात घेतले जात नसल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून बारदानासाठी धान खरेदी केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. केंद्र चालक मात्र त्यांना जुने फाटलेले बारदान घेऊन जाण्यास सांगतात. नवीन बारदान येण्याची शाश्वती नाही त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
भात साठवणुकीसाठी शेतकर्यांकडे व्यवस्था नाही. मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणीचा सामना करत शेतकर्यांनी भात शेतातून घरात आणले आहे. बारदानाशिवाय भात खरेदी केले जाणार नसल्याचे केंद्र चालक सांगतात. गेला रब्बी हंगाम संपत आला तरी बारदान न आल्याने शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. मोठा गाजावाजा करत आमदारांच्या उपस्थितीत भात खरेदी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र अजूनही येथील शेतकरी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. शेतकर्यांना बारदान पुरवण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र कोणत्या कारणामुळे बारदान पुरविला जात नाही. हे कळण्यास मार्ग नाही या केंद्रावर नियंत्रण ठेवणारे आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी शेतकर्यांचे फोनच उचलत नसल्याची तक्रार आहे. वाडा तालुक्यातील काही भात खरेदी केंद्रातील गोडाऊन केंद्र सुरू व्हायच्या आतच भरली असल्याचे काही शेतकरी सांगतात. या संदर्भात आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकार्यांकडे विचारणा केली असता ते भात गोडाऊन मालकाने खासगीत खरेदी केलेली असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे मात्र ही भरलेली गोडाऊन तत्काळ खाली करून त्याचे फोटो अधिकार्यांमार्फत सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने याविषयीचा संशय अधिक बळावला आहे. अधिकारी मात्र या केंद्र चालकांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. तरी शासनाने या केंद्रांवर लवकरात लवकर बारदानाचा पुरवठा करून धान खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.