Palghar : वाडा तालुक्यातील मलवाडा फाटा येथे आज सकाळी पावणेसात वाजता चिंचपाडा-वाडा या बसचा एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 47 विद्यार्थी व 8 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर विविध खाजगी व शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांसह 63 प्रवासी होते. (Palghar Bus truck accident in Wada 55 passengers injured two seriously)
हेही वाचा- आंदोलनाआधीच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा वाढवला महागाई भत्ता वाढवला; किती टक्क्यांनी वाढ?
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील चिंचपाडा येथून सकाळी सव्वासहा वाजता अपघात झालेली बस वाड्याच्या दिशेने येत होती. वाडा येथील पी.जे. हायस्कूल व स्वामी विवेकानंद या दोन्ही माध्यमीक शाळांची वेळ सकाळीच असल्याने चिंचपाडा, पीक, शिलोत्तर, देवळी मानिवली या परिसरातील 56 शालेय विद्यार्थी या बसमधून प्रवास करात होते. या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य 7 प्रवासी या बसमधून प्रवास करत होते.
वाड्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देसई नाका येथील वळणावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यावेळी बसमधून प्रवास करणार प्रवासी बेसावध होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडाला, दातांना व डोक्यावर जबर मार लागला आहे. या अपघातात तेजु घाटाळ (17) या विद्यार्थिनीच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी ठाणे येथे तर, बस चालकाला उपचारासाठी कल्याणी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुका मार व अनेक जखमा झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
हेही वाचा – जालन्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तरी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले…
दरम्यान अपघाताची बातमी समाजमाध्यमातून सर्वत्र पसरताच वाडा ग्रामीण रुग्णालयाला जत्रेचे स्वरूप आले होते.
अपघाताची माहिती मिळताच पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके व एस.टी. महामंडळाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी विलास राठोड यांनी भेटी देऊन जखमींची विचारपूस केली व संबंधित विभागांना तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.