पालघर: आगरवाडी नजीक असलेल्या विळंगी येथे तारा सदानंद भोईर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करणार्या आरोपीस 12 तासात जेरबंद करण्यात केळवे सागरी पोलीस स्टेशनला यश आले.तारा सदानंद भोईर (वय 65) या आपल्या मोठे घर आळी विळंगी येथे घरातील काम करत असताना अनोळखी इसमाने त्यांच्या अंगावर व चेहर्यावर कपडा टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ व कानातील कुड्या असा एकूण 2 लाख 31 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून त्यांना किरकोळ दुखापत सुद्धा करून पळ काढला होता. या घटनेची तक्रार केळवे सागरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर व प्रभारी अधिकारी केळवे सागरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर तपासाची चक्रे फिरल्यानंतर गोस्वामी आणि त्यांच्या तुकडीने गुन्हेगारास बारा तासात जेरबंद करून त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल ही हस्तगत करण्यात यश आले. इतक्या जलद गतीने तपास लावल्याबद्दल केळवा सागरी पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे.
Palghar Crime: अवघ्या बारा तासात गुन्हेगार जेरबंद
written By My Mahanagar Team
palghar