पालघरः पालघर जिल्ह्यात जी विकासकामे व प्रकल्प सुरू आहेत व भविष्यात सुरू होणारे आहेत, ते पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात युवकांसाठी ६ हजार २३४ दाखले वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीतील बाधितांना मदत देण्यात आली. जनतेच्या तक्रारी निकाली काढल्या. १६ हजार ७३२ खातेदारांना सातबारा आणि आठ ‘अ’ चे वाटप करण्यात आले. सैनिकांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र, दाखले देण्यात आले. वीरमाता अनुराधा गोरे यांना पालघर येथे पाच एकर जमीन प्रदान करण्यात आली आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील पाच हजार अंगणवाडी कर्मचार्यांची डॉ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीरातून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातून होत असल्याचे आदिती तटकरे यांनी पुढे बोलताना सांगितले.
राज्याचा अर्थसंकल्पातून मार्च २०२३ व जुलै २०२३ मध्ये रू.29.64 कोटी किंमतीचे 340 रस्ते व 32 पूल यांची कामे मंजूर आहेत. नाबार्ड अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 16 रस्ते व पूल यांची कामे मंजूर आहेत. तसेच तलासरी तालुक्यातील बोरमाळ येथील दरोठा नदीवर पूल बांधण्याच्या कामास जिल्हा नियोजन समितीमधून रुपये पाच कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे, अशीही माहिती तटकरे यांनी दिली. पालघर जिल्ह्यामध्ये सन 2023 खरीप हंगामासाठी राज्य शासनाकडून 1 रुपयात पीक विमा योजना घोषित करण्यात आलेली आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत शेतकर्यांनी तीनपट प्रतिसाद देऊन 66 हजार 433 इतक्या शेतकर्यांनी विमा नोंदणी केली आहे. भात, नाचणी व उडीद पिकांचे एकत्रित 68 हजार 978 हेक्टर इतके क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. पालघर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनामार्फत मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, समर्पित मालवाहू रेल्वे मार्गीका प्रकल्प, विरार-डहाणू रेल्वेमार्ग चौपदरीकरण यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे दळणवळणाची साधने उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.