घरपालघरऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला पालघर जिल्हा!

ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला पालघर जिल्हा!

Subscribe

सागरी, शहरी आणि डोंगरी या तीनमध्ये विभागल्या गेलेल्या पालघर जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

सागरी, शहरी आणि डोंगरी या तीनमध्ये विभागल्या गेलेल्या पालघर जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मुंबईच्या वेशीवर असल्याने नागरीकरण वेगाने झाले. तर औद्योगिक वसाहतींमुळे हाताला कामही मिळाले. महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे नागरी विकासही होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. तारापूर येथील अणुशक्ती प्रकल्पामुळे जिल्ह्याला विशेष महत्व लाभले आहे. वसई, पालघर, डहाणू तालुके प्रामुख्याने सागरी पट्ट्यात मोडले जातात. वसई आणि पालघरमध्ये नागरीकरण वेगाने झाल्याने शहरात बदल झाला आहे. पूर्वेला सह्याद्रीच्या डोंगररांगा असून तो पट्टा जंगलपट्टी अर्थात डोंगरी म्हणून ओळखला जातो. पालघर जिल्ह्याला ११२ किलोमीटरचा अथांग सागरी समुद्रकिनारा लाभला आहे.

बंदरपट्टी भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी, दातिवरे, मुरबे, नवापूर, दांडी, आलेवाडी, नांदगांव बंदर तसेच वसई तालुक्यातील नायगांव, पाचुबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा आणि डहाणू तालुक्यामधील बोर्डी, चिंचणी आणि डहाणू याठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत. त्याचबरोबर बंदरपट्टीत वसई सुरुची बाग, भुईगाव, कळंब, राजोडी, अर्नाळा, केळवा, चिंचणी, नरपड, बोर्डी असे एकाहून एक सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांचे आर्कषण ठरले आहेत. त्यातून पर्यटन व्यवसायालाही बळकटी मिळू लागली आहे. जिल्ह्याला सह्याद्री पर्वताच्या घनदाट अरण्याच्या रांगा लाभल्या आहेत. या जंगलपट्टी विभागात प्रामुख्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी तालुके मोडतात. जव्हार थंड हवेचे ठिकाण असून मिनी महाबळेश्वर, अशी त्याची ओळख आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील पालघर, वसई आणि जव्हार तालुक्यांना सोनेरी इतिहासाचा वारसा आहे. वसई तालुक्यावर पूर्वी पोतुर्गीजांचे अधिराज्य होते. पेशवे काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोतुर्गीजांच्या साम्राज्याला सुरुंग लावत मराठी झेंडा रोवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ‘सन १९४२ चे चले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर हे महत्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाच हुतात्मा शहीद झाले होते.१९३० चा मिठाचा सत्याग्रह सुरु झाला. तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटीपासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सहभागी होते. सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती. जव्हार येथे राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान होते. तेथील राजे मुकणे संस्थानाचा प्रसिद्ध राजवाडा आजही इतिहासाची साक्ष देत आहे.

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली, कातकरी, मल्हार कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी साम्राज्याने आपला सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही समाज जीवनाची ओळख आहे.
वारली चित्रकारी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा मनुष्य वास्तव्य करत होता. त्या काळापासून म्हणजे साधारपणे ११०० वर्षापासून जतन केलेली आहे. ही चित्रे कुठल्याही प्रकारचा रासायनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणार्‍या माती, तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग आणि बांबूच्या काड्यांचे ब्रश वापरून काढली जातात. ही कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागणी आहे. जिल्हा पर्यटकांचेही मुख्य केंद्र बनले आहे. अथांग सागरासोबतच धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारे किल्ले, मंदिरे, पर्यटकांना आकर्षित करत असतात. विरारची जीवदानी देवी, तुंगारेश्वर पर्वतावरील महादेव मंदिर, वज्रेश्वरी देवी, शितलादेवी, महालक्ष्मी देवींची पुरातन मंदिरे याठिकाणी आहेत. त्याचबरोबर वसई, अर्नाळा, तारापूर, माहीम, कालदुर्ग किल्ले इतिहासाची साक्ष देतात. तर वसईत पोर्तुगीज कालिन चर्चेस दिमाखात उभी आहेत. त्याचबरोबर नालासोपारा येथील बौद्ध स्तूप इतिहासाची साक्षीदार आहे.

- Advertisement -

बोईसर, तारापूर येथील मोठ्या औद्योगिक वसाहतींसोबतच पालघर, वसई, वाडा येथील औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये मुख्यतः कापड उद्योग, रासायनिक कारखाने, अभियांत्रिकी उद्योग, स्टील उद्योग इत्यादीचा समावेश आहे. बोईसर येथे टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील, विराज स्टील आदी पोलाद निर्मिती करणारे कारखाने आहेत. तसेच डी-डेकॉर, सियाराम यासारख्या कापड निर्मिती करणार्‍या कंपन्या आहेत. वाडा तालुक्यात ओनिडा, कोका कोलासारखे नामांकित कारखाने आहेत. या उद्योगांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि पूरक व्यवसाय निर्मिती झालेली आहे. जव्हार, मोखाडा व विक्रमगड या डोंगराळ जंगलपट्टी भागातील आदिवासी समाजाचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. या भागात प्रामुख्याने भात व नागली यांची शेती केली जाते. अलिकडच्या काळात हळद, स्ट्रॉबेरी, अननस लागवडीचा प्रयोगदेखील यशस्वी झालेला आहे. डहाणू तालुक्यात चिकूपासून वाईन तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. याशिवाय जंगलातील मध, लाख, औषधी वनस्पती इत्यादी गौण उत्पादनांमुळेही लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

शैक्षणिकदृष्ट्याही हा जिल्हा प्रगती करू लागला आहे. वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा या तालुक्यांमुळे सर्व प्रकारची महाविद्यालये तसेच पॉलिटेक्निक आणि इंजिनियरिंगसह विविध विभागाचे उच्च शिक्षण देणारी कॉलेजेस आहेत. जव्हारमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे.

ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला पालघर जिल्हा!
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -