बोईसर : पालघरमध्ये एका विकृत व्यक्तीने ८ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (ता.२९) उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीला चोप देत पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले. किराणा दुकानदार असलेल्या या ५४ वर्षीय विकृताने मुलीला दुकानात बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला असून त्याने याआधीही असे कृत्य केल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे.
पालघर पोलीस ठाणे क्षेत्रामधील एका परिसरात ही पीडित मुलगी राहत असून ती राहत असलेल्या परिसरात हा व्यक्ती किराणा मालाचे दुकान चालवतो. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ही मुलगी या किराणाच्या दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली असता तिच्यासोबत त्याने अश्लिल वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर (ता.२९) ती मुलगी दुकानात गेल्यानंतर परत त्याने तिच्यासोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी करत विकृताला दुकानाबाहेर काढून चोप दिला. त्यानंतर त्याला पालघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम अंतर्गत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.