Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरPalghar Roads: टेंभोडे येथील मराठी शाळा ते तलावपाडा रस्त्याची दुरवस्था

Palghar Roads: टेंभोडे येथील मराठी शाळा ते तलावपाडा रस्त्याची दुरवस्था

Subscribe

अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर: पालघर नगरपरिषद क्षेत्रातील टेंभोडे येथील मराठी शाळा ते तलावपाडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. नगर परिषदेने हे खड्डे बुजवणे अपेक्षित असताना अजूनपर्यंत तसेच आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरपरिषदेला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

टेंभोडे येथील जिल्हा परिषद शाळेसमोरुन जाणार रस्ता हा तलावपाड्यापर्यंत जातो व पुढे तो खारेकुरण व कॉलेज रोडला मिळतो. या मार्गावरून प्रवास करणे फार जिकीरीचे झाले आहे. साधारण सात ते आठ महिन्यांपासून रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत. आता या खड्ड्यांचा आकारही वाढला आहे. साधारण अडीच फूट लांब व एक ते दीड फूट रुंद तसेच साधारण एक फूट खोल खड्डे झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये या मार्गावर त्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आपटून अपघात सुद्धा झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

या मार्गावर यशवंतराव चाफेकर महाविद्यालय, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व सत्ययश शाळा आहे. या इथून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करीत आहेत. तसेच अनेक गृह संकुल सुद्धा या मार्गावर असल्याने दररोज प्रवास करणार्‍यांची संख्या हजारोच्या घरात आहे. नगरपरिषदेने युद्धपातळीवर हे खड्डे बुजवायला हवेत. मात्र त्यांना याबाबत काही पडलेले दिसत नाही. नगरपरिषदेने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून हे खड्डे पडले आहेत. याबाबत नगरपरिषदेला वेळोवेळी सूचित करण्यात आले. मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत काहीच झालेले नाही. पुढील आठ दिवसात त्यांनी या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आंदोलनाच्या मार्गाने आम्ही हा प्रश्न मार्गी लावू .

- Advertisement -

–राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते

या रस्त्याच्या नवीन कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. तरी या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करू
–विपुल कोरपड, बांधकाम अभियंता, पालघर नगर परिषद


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -