पालघर: सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका पालघरच्या ग्रामीण जनतेला बसत असल्याचे जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांच्या स्थितीवरून दिसून येते. जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ४००० पेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम जनविकासाच्या कामांवर होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासही खुंटात असल्याचे आरोप केले जात आहेत. जिल्ह्यात महायुतीचे एक खासदार व पाच आमदार सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांनी सरकार दरबारी या प्रश्नावर विशेष लक्ष देऊन रिक्त पदाचा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी ही मागणी जिल्हा वासियांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत आठ पंचायत समित्या येत असून मोखाडा, विक्रमगड या दोन पंचायत समित्यांना गटविकास अधिकारीच नाहीत. तर तलासरी, विक्रमगड या पंचायत समित्यांना सहाय्यक गटविकास अधिकार्यांची कमतरता आहे. ग्रामीण जनतेला दुर्गम भागात रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेले गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी हे पद गेल्या दहा वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यातील बहुतांश मुले व मुली जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शिक्षण घेत असतात. या शिक्षण विभागाला सुद्धा रिक्त पदांची घरघर लागलेली आहे. पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू व वाडा अशा सहा तालुक्यांना गटशिक्षण अधिकारीच नाही. यासह प्राथमिक व माध्यमिक विभागाची प्रत्येकी दोन उपशिक्षण अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात कुपोषण व अंगणवाडी याकडे विशेष लक्ष देणार्या महिला बालकल्याण विभागामध्येही रिक्त पदांचा परिणाम जिल्ह्याच्या कुपोषणावर होत आहे. या विभागासाठी अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणारे अनुसूचित जमाती क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारीच अजूनही शासनाने दिलेले नाहीत. ११ पैकी तब्बल ६ पदे येथे रिक्त आहेत तर बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये ही एक पद या अंतर्गत रिक्त आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२४ पर्यंत ब’ क’ ड या संवर्गात ११ हजार ३४ मंजूर पदे होती. त्यापैकी ६९४६ पदे भरली गेलेली असून तब्बल ४०८८ पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांचा ताण आता असलेल्या कर्मचारी वर्गावर येत असून या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या विकासाला पाचर बसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषदेच्या आणि ब’संवर्गातील ३११ मंजूर पदांपैकी १९० पदे भरली असून येथेही १२१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विभागांचा कारभार चालवणारेच खुर्चीवर न बसल्यामुळे जनविकासाची कामे जलद गतीने होणार कशी असा प्रश्न विचारला जात आहे.
गट १ व वर्ग २ अधिकार्यांच्या रिक्त पदांची माहिती
मंजूर पदे – २६
रिक्त पदे- ८
गट-अ व गट-ब रिक्त पदांची माहिती
मंजूर पदे – ३११
रिक्त पदे – १२१
गट ब, क व ड संवर्गातील वर्गातील रिक्त पदांची माहिती
मंजूर पदे – ११०३४
रिक्त पदे – ४०८८