परवानगी एका मजल्याला, बांधले चार

पालघर तालुक्यातील ढेकाळे गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक 81/6,81/7,81/8आणि 82/2 ची शेतजमीन रहिवास आणि व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी शेलटर ग्रुप ऑफ रिसॉर्ट अँड हॉटेल मार्फत बिनशेती करण्यात आली होती.

मनोर: तीस वर्षांपूर्वी पालघरच्या तहसीलदारांकडून मिळवलेल्या बिनशेती आदेशानुसार तळमजला अधिक एक मजल्याच्या इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी असताना चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.नवीन इमारतीचे बांधकाम निम्म्याहून अधिक पूर्ण झाल्यानंतर विकासकाने सुधारित बिनशेती आणि बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे निम्म्याहून अधिक बांधकाम पूर्ण झाले असताना स्थानिक महसूल कर्मचार्‍यांनी विकासकाच्या बाजूने पंचनामा करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जुन्या बिनशेती आदेशातील अटी शर्तींच्या उल्लंघन प्रकरणी कारवाईची मागणी केली जात आहे. पालघर तालुक्यातील ढेकाळे गावाच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक 81/6,81/7,81/8आणि 82/2 ची शेतजमीन रहिवास आणि व्यावसायिक बांधकाम करण्यासाठी शेलटर ग्रुप ऑफ रिसॉर्ट अँड हॉटेल मार्फत बिनशेती करण्यात आली होती.

28 डिसेंम्बर 1995 साली तत्कालीन तहसीलदारांकडून रिसॉर्टच्या बांधकामासाठी सुधारित बिनशेती आदेश देण्यात आला होता.आदेशात तळमजला अधिक एक मजल्याच्या इमारतीचे बांधकामाची परवानगी बिनशेती आदेशात देण्यात आली होती.बिनशेती केलेल्या जागेत तळमजला अधिक एक मजल्याची इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु वर्षभरापूर्वी जागेवर असलेली जुनी इमारत आणि इमारती लगत नवीन बांधकाम सुरू करण्यात आले होते.फेब्रुवारी तळमजला अधिक तीन मजल्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. नवीन बांधकाम सुरू करताना ढेकाळे ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला घेण्यात आला नसल्याची माहिती ग्रामससेवक सतीश भागवत यांनी दिली.

प्रतिक्रिया,
ढेकाळे उड्डाणपुलालगतच्या जागेचे सुधारित बिनशेती आदेश आणि इमारतीच्या बांधकामाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
– धनाजी तोरसकर, उपविभागीय अधिकारी, पालघर.