वसईः पालघर जिल्ह्यात पेसा शिक्षक भरती करण्याच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक येथे पेसा कक्ष दालन स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा,उपनेते राजेशभाई शहा,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद शिंगडे यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक शेषराव बडे उपस्थित होते. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असुन ६ तालुके पुर्ण पेसा तर २ तालुके अंशतः पेसा आहेत. संचमान्यता २०२२-२३ नुसार जिल्ह्यात पेसा क्षेत्रात एकूण रिक्त पदे १८०७ आहेत. त्यापैकी १३१८ पदे भरण्यास शासनाने जिल्हा परिषदेला परवानगी दिली आहे. यासाठी २०२२ मध्ये टीएआयटी परीक्षा दिलेल्या पालघर जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी २५५६ उमेदवारांची गुणवत्ताक्रमानुसार यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे.
सदर यादीतील अपात्र उमेदवार वगळणे, पात्र उमेदवारांची गटनिहाय सेवाजेष्ठता अंतिम करणे, समांतर आरक्षण यादी बनवणे,कागदपत्र पडताळणी करून नियुक्तीसाठी रिक्त जागा निश्चित करून त्यानुसार समुपदेशन करणे, यासाठी जिल्हा पडताळणी समिती सहकार्य करणे व उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन करणे इ. कामांच्या हेतूने या कक्षाची स्थापना करण्यात आली असून अनुभवी अधिकारी अणि कर्मचारी यांच्यावर या दालनाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- Advertisement -
- Advertisement -