विरार : वसई- विरार परिसरात प्लास्टिक पिशव्या बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. शहरात सर्रास व्यापारी प्लास्टिक पिशव्यांची विक्री करत आहेत. पोलीस आणि पालिका असमर्थ ठरत असल्याने शहरात प्लास्टिक तस्करांचे साम्राज्य उभारले जात आहे. यामुळे शहराच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेने शहरात २०१८ पासून संपूर्ण प्लास्टिकबंदी लागू केली. त्यानुसार पालिकेने शहरात काही दिवस कडक कारवाई करत प्लास्टिकचे कारखाने बंद पाडले तर व्यापार्यांना त्यांच्या जवळील प्लास्टिक पालिकेकडे सुपूर्द करण्यास भाग पाडले. यावेळी पालिकेने हजारो टन प्लास्टिक जप्त केले. पण जप्त केलेल्या प्लास्टिकचे कारवायाचे काय याचे कोणतेही नियोजन नसल्याने या कारवाईला विराम लागत गेला आहे. त्यानंतर ही कारवाई केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने प्लास्टिक तस्करांनी आपले पाय पसरवण्यास सुरूवात केली.
पोलीस आणि पालिका यांना माहिती असूनही केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. कोविड काळात प्लास्टिक विरोधी कारवाई बंद असल्याने प्लास्टिक माफियांनी आपले चांगलेच पाय पसरले आहेत. फेरीवाले आणि रस्त्यावरील विक्रेते यांचे मोठे ग्राहक आहेत. त्यांना साखळी पद्धतीने छुप्या मार्गाने पिशव्या पुरवल्या जातात, असे देखील सांगण्यात आले आहे.
मोकाट जनावरे व कुत्री पिशवीसह असे पदार्थ खात असल्याने बहुतांश पाळीव जनावरांच्या पोटात असे प्लास्टिक सापडत आहे. महापालिकेकडून प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, वापरल्या जाणार्या प्लास्टिकचे रिसायकलिंग करणारा प्रकल्प पालिकेकडे नाही, घंटागाड्यांद्वारे प्लास्टिक स्वतंत्रपणे गोळा करण्याची यंत्रणाही नाही. अशा स्थितीत किमान प्लास्टिक वापर टाळण्याबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचा पर्याय असताना महापालिका त्याबाबत उदासीन आहे. यामुळे शहरात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. वाढत्या मागणीमुळे पुन्हा प्लास्टिक माफिया सक्रीय झाले आहेत.
शहरात प्लास्टिकचा वापर हा वाढला आहे. पालिकेने दुकानदारांवर आणि आठवडे बाजारातील दुकानावर कारवाई करणे गरजेचे आहे.
– तेजस तेंडुलकर, देवा ग्रुप, वसई तालुका अध्यक्ष