घरपालघरमारेकरी दुबेला मदत करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

मारेकरी दुबेला मदत करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Subscribe

याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अनिल दुबे, शशिकांत धुरेसह त्याच्या साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वसई : बँक मॅनेजरचा मारेकरी, दरोडेखोर असलेल्या अनिल दुबेला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदार शशिकांत धुरे यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशीही सुरु करण्यात आली आहे. विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरची हत्या करून कॅशियरला गंभीर जखमी करून दरोडा टाकणारा अनिल दुबे गेल्या शुक्रवारी वसई कोर्टाच्या परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. यावेळी त्याच्या संरक्षणासाठी असलेले सहाय्यक फौजदार शशिकांत धुरे यांच्या मोबाईलवरून दुबेने त्याच्या साथिदाराला मोटार सायकल घेऊन बोलावून घेतले होते. त्याच्याच मोटारसायकलवरून दुबे पसार झाला होता. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अनिल दुबे, शशिकांत धुरेसह त्याच्या साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा ३ च्या पथकाने दोन दिवसांत त्याचा शोध घेऊन दुबे आणि त्याचा साथादीर चांद खान याला अटक केली आहे. त्याला ठाणे कारागृहातून वसई न्यायालयात नेण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी शशिकांत धुरे (५२) याने हलगर्जी दाखवल्यामुळेच दुबे फरार झाल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या तावडीतून निसटलेला अनिल दुबे नेपाळ किंवा पंजाबला पळून जाणार होता. चोरीच्या गुन्ह्यात ठाणे कारागृहात असलेल्या नालासोपार्‍यातील चांद बादशहा खान याची अनिल दुबेशी ओळख झाली होती. कारागृहातच दोघांनी पलायनाची योजना बनवली होती. चांद जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रत्यक्ष योजना अंमलात आली. चांदने दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावली आणि शुक्रवारी न्यायालयाबाहेर येऊन थांबला. दुबे पोलिसांना लघुशंकेचा बहाणा करून सटकला आणि चांदच्या दुचाकीवर बसून फरार झाला.
गुन्हे शाखा-३ च्या पथकाने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहिती काढून चांदची ओळख पटवली आणि त्याच्या नातेवाईकांना चौकशीसाठी आणले. चांदला पकडले जाण्याची भीती वाटली आणि त्याने दुबेला मध्येच सोडून दिले.
दोन रात्र त्याने पदपथावर काढली. त्याच्याकडे पैसे नव्हते. सोमवारी वसईच्या गावराई पाड्यात नातवाईकाकडे आश्रयासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -