घरपालघरआरएमसी प्लांटचे प्रदूषण मिरचीसाठी तिखट

आरएमसी प्लांटचे प्रदूषण मिरचीसाठी तिखट

Subscribe

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या आरएमसी प्लान्टमधून बाहेर पडणार्‍या सिमेंटमिश्रीत धूलीकणांच्या प्रदूषणामुळे सभोवतालच्या बागायती शेतीला मोठा फटका बसत आहे.

सचिन पाटील, बोईसर : वाणगाव जवळील आरएमसी प्लांटला दिलेली मुदत संपून देखील विनापरवानगी सुरू असलेल्या या प्लांटमधील प्रदूषणामुळे आजूबाजूच्या मिरची शेतीला मोठा फटका बसत असून यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. वाणगाव-चारोटी मार्गावरील दाभले गावच्या हद्दीतील गट क्र.१४५/८ आणि १५७/२ मधील ८ हेक्टर जागेवर प्रिमीयम इन्फ्रा सर्विसेस प्रा.लि.या कंपनीकडून आरएमसी प्लांट उभारण्यात आला आहे.या प्लांटसाठी दाभले ग्रामपंचायतीने २५ जून २०२० रोजी दोन वर्षांसाठी दिलेल्या ना हरकत परवानगीची मुदत २५ जून २०२२ ला संपलेली असताना सुद्धा कंपनीने या परवानगीचे नूतनीकरण न करताच मागील ६ ते ७ महिन्यांपासून हा प्लांट विनापरवानगी बेकायदेशीरपणे सुरू ठेवला आहे.या आरएमसी प्लांटमधून वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर मार्गावरील पूल आणि इतर कामांसाठी आवश्यक रेडीमिक्स काँक्रीट तयार करून त्याची वाहतूक केली जाते.यासाठी वाणगाव पूर्वेला प्रीमियर इन्फ्रा कंपनीमार्फत कास्टिंग यार्ड उभारण्यात आला असून याठिकाणी मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या आरएमसी प्लान्टमधून बाहेर पडणार्‍या सिमेंटमिश्रीत धूलीकणांच्या प्रदूषणामुळे सभोवतालच्या बागायती शेतीला मोठा फटका बसत आहे.

वाणगाव परिसरात पिकणारी साधी मिरची आणि ढोबळी मिरची संपूर्ण देशात प्रसिद्ध असून परदेशात देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होते.या परिसरात साधी मिरची ८०० हेक्टर तर ढोबळी मिरचीचे २५० हेक्टरवर पीक घेतले जाते.यासाठी येथील प्रयोगशील शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत मोठमोठ्या बागा उभारल्या आहेत.परंतु वाणगाव पूर्वेला दाभले गावानजीक प्रीमियर इन्फ्रा कंपनीच्या कास्टिंग यार्डमधील आरएमसी प्लांटमधून उडणारे धुलीकण हवेद्वारे आजूबाजूच्या बागायतीमधील पिकांवर बसत असल्याने मोठ्या प्रमाणात रोग पसरून पिकांची प्रत घसरली आहे.यामुळे शेतकर्‍यांना अपेक्षित दर मिळत नसून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.त्याचप्रमाणे कास्टिंग यार्डच्या शेजारील आदिवासी पाड्यातील घरांवर देखील धुळीचे कण पसरून त्याचा लोकांना त्रास होत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून स्थानिक ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी न घेताच हा प्लान्ट बिनबोभाटपणे सुरू असून वाणगाव परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

बॉक्स –

डहाणू परिसर हा पर्यावरणीय दृष्ट्या अतीसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला असून प्रदूषण करणारे नवीन कारखाने, उद्योगधंदे,दगडखाणी,आरएमसी प्लांट,क्रशर सारखे पर्यावरणाला धोका निर्माण करणारे प्रकल्प सुरू करण्यास बंदी आहे.त्यामुळे शेती आणि बागायतीला गंभीर धोका पोचवणार्‍या प्रदूषणकारी आरएमसी प्लांटला परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक बागायतदारांनी केली आहे.

- Advertisement -

कोट –

वाणगावमधील सुरू असलेल्या आरएमसी प्लांटची चौकशी करण्यात येईल.यामध्ये त्यांच्याकडे आवश्यक परवानग्या नसतील तर संबंधित कंपनीविरोधात नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल.

अभिजीत देशमुख,
तहसीलदार,डहाणू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -