लोकसंख्या लाखात; लस मात्र हजारात

Government panel recommends against allowing SII to conduct trial of Covovax on children
सीरम इन्स्टिट्युटला झटका! लहान मुलांवर लसीची चाचणी करण्यास मिळाली नाही मंजूरी

पंचवीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेला काही हजाराच्या घरातच लसीचा साठा मिळतो. त्यामुळे लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. मात्र, लसींचा तुटवडा असल्याने दररोज कुठल्या ना कुठल्या लसीकरण केंद्रावर वाद होताना दिसून येतो. पालघर जिल्ह्यातील वसई विरार ही मोठी महापालिका असून लोकसंख्या जवळपास 25 लाखाच्या घरात आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथील प्रशासनाला कोरोनावरील लस हवी असताना याठिकाणी येणारी लस ही हजारामध्येच येत असल्याने याठिकाणी लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत आहे. त्यातून कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद होत आहेत, अशीच घटना गेल्या आठवड्यात वसईतील एव्हरशाईन नगर, विरार येथील चंदनसार आणि विवा कॉलेज येथील लसीकरण केंद्रावर घडली आहे. यासाठी शासनाने वसई विरारसाठी मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्याकडे केली आहे.

वसई विरार महानपालिकेच्या लसीकरण मोहिमेचा पुरता गोंधळ उडाला असताना शासनाकडून होणाऱ्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाच्या गतीत संथगतीने होत आहे. लसीचा साठा कमी असल्याने आठवड्यातून दोन-तीन दिवस तर लसीकरण बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर येते. तर अनेकदा ठरविक लसीकरण केंद्रावरच लसीकरण करावे लागत आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या वसई विरारकराना शासनाकडून हजारांमध्येच लस आतापर्यंत उपलब्ध झाली आहे.

त्याउलट बाजूच्या मीरा भाईंदर आणि ठाणे जिल्ह्याला मात्र मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याचे समोर येत आहे. जानेवारी महिन्यापासून अनेकवेळा केवळ लस उपलब्ध होत नसल्याने महापालिकेला लसीकरण बंद ठेवावे लागले होते. याठिकाणी हजारांमध्ये येणाऱ्या लसीचे वाटप कसे करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे पडत आहे. तर ज्यादिवशी लस उपलब्ध असल्याचे समजते त्यावेळी पहाटे ४ वाजल्यापासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे.

वसई विरारमध्ये लस कमी प्रमाणत येत असल्याने काही नागरिक नजिकच्या मीरा-भाईंदर महापालिकेत मुबलक लस पुरवठा असल्याने तेथे जाऊन अपले लसीकरण करून घेत आहेत. जास्त लोकसंख्या लक्षात घेता किमान १० लाख डोसेस मिळाले तर २५ टक्के लोकसंख्येचे कोविडपासून नियंत्रण करता येईल. पालघर जिल्हयाला होणाऱ्या लस पुरवठयापैकी ५० टक्के लस ही वसई विरार शहर महापालिकेस मिळावी जेणेकरून कोविड प्रादुर्भावाला आळा घालता येईल.
– क्षितिज ठाकूर , आमदार

महापालिका हद्दीत असलेल्या जवळपास २१ लसीकरण केंद्रावर १०० ते जास्तीत जास्त २०० लसीचा साठा देण्यात येतो. मात्र प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर ४०० ते ४५० नागरिकांची गर्दी होते असल्याने महापालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद उदभवताना दिसत आहेत. महापालिका हद्दीत आतापर्यंत एकूण लोकसंखेच्या केवळ ११.५ टक्के लसीकरण करण्यात महापालिकेला यश आले आहे. यात सुद्धा पहिला डोस ९.१ टक्के नागरिकांना तर दुसरा डोस २.१ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. यामुळे अजूनही ८८.५ टक्के नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.

पहाटे ४ वाजल्या पासून लस घेण्यासाठी लाईन लावून उभे राहिल्यावर महापालिकेचे कर्मचारी १० वाजता आल्यावर फक्त १०० लसीचे डोस आले आहेत असे सांगतात. सकाळ पासून लस घेण्यासाठी उभे असलेल्या वेगवेगळे आजार असलेल्या नागरिकांनी काय करावे. महापालिकेने आणि शासनाने यासाठी योग्य ते नियोजन करायला हवे. तसेच शासनाने हि इतक्या मोठ्या प्रमाणत लोकसंख्या असलेल्या ठिकाणी लस जास्त प्रमाणात उपलब्ध करायला हवी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.

वय वर्षे १८ ते ४४ पर्यंतचे लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी वेळ कमी असल्याने रजिस्ट्रेशन करताना अनेक अडचणी येत असून नोंद केलेल्या नागरिकांना देखील लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.त्यातच पुरेशा प्रमाणत लस उपलब्ध होत नसल्याने या गटातील नागरिकांसाठी महापालिका हद्दीतील ठराविक ठिकाणीच लसीकरण केंद्र सुरु असल्याने त्याठिकाणी युवकांची गर्दी मोठ्या प्रमाणत होत आहे.