भाईंदर :- मीरा- भाईंदरमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याचे दिसून येते. या गटबाजीमुळे जिल्हाध्यक्ष निवडीवरून नेहमीच वाद झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक किशोर शर्मा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी जुन्या पदाधिकार्यांना विश्वासात न घेता १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत,असा आरोप होत आहे. या नियुक्त्या केल्यामुळे प्रदेश पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातूनच जिल्हाध्यक्ष शर्मा यांनी नियुक्त केलेल्या १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
मीरा- भाईंदर भाजपमध्ये आमदार गीता जैन, मीरा- भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख रवी व्यास आणि माजी आमदार नरेंद्र मेहता असे तीन गट असल्याची चर्चा आहे. तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या जागी रवी व्यास यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मेहता गटाकडून या नियुक्तीला विरोध करण्यात आला होता. त्यावेळी काही नगरसेवक मेहता यांच्या बरोबर तर काही नगरसेवक व्यास यांच्याबरोबर होते. त्यानंतर एक दुसर्याच्या कार्यक्रमाला जाणे बंद केले होते. पक्षश्रेठी यांनी अनेक वेळा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद संपुष्टात येत नसल्याचे दिसून येते. त्यानंतर व्यास यांची विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तर माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक किशोर शर्मा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे मेहता यांनी रवी व्यास व आमदार गीता जैन यांना धक्का देत बाजी मारल्याची चर्चा सुरू झाली.
परंतु, पक्ष नेतृत्वाने शहरातील पदाधिकारी नियुक्त करताना शर्मा यांनी केवळ मेहता यांच्या सांगण्यावरून त्यांच्याच समर्थकांनाच घेऊ नये आणि रवी व्यास यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सामावून घ्यावे असे शर्मा यांना सूचित केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार शर्मा यांच्या जिल्हा कार्यकारिणीत व्यास समर्थकांची सुद्धा नावे दिसली. परंतु पक्ष संघटनेत महत्वाच्या असलेल्या मंडळ अध्यक्ष यांच्या नियुक्त्या केल्यानंतर त्यामध्ये मेहता समर्थक असल्याचे दिसून आले. आता या नियुक्त्यांना थेट प्रदेश सचिव विक्रांत पाटील यांनी एक पत्र पाठवून त्या नियुक्त्यांना स्थगिती दिली असल्याचे सांगितले जात आहे. पुढील अधिकृत मंडळ अध्यक्षांची घोषणा होईपर्यंत या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.