विरार : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले असून याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आता भाजपाने नेते प्रवीण दरेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Pravin Darekar reaction to Vinod Tawde distributing money at Vivant Hotel)
पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, भाजपाचा राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभा मतदारसंघामध्ये पैसे वाटप करू शकतो किंवा पाकीट वाटतो आहे, हा आरोपच मला हास्यास्पद वाटतो. कारण महाविकास आघाडीच्या हातातून ही निवडणूक गेली आहे, हे त्यांच्या वर्तणातून आणि वागण्यातून दिसून येत आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आपला पराभव स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून त्यांना महाराष्ट्रात थोडं यश मिळालं. पण आता या निवडणुकीमध्ये काल प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमांतून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले नाहीत. कारण आम्ही सत्ताधारी पक्ष आणि महायुती म्हणून त्यांचे सर्व नरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत, हे सांगण्यात यशस्वी झालो, असा हल्लाबोल दरेकर यांनी केला.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाकडे नैतिकता असेल तर तावडेंवर कारवाई करतील, पैसे वाटल्याप्रकरणी राऊतांची टीका
प्रविण देरकर यांनी म्हटले की, विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने काय केलं, हे आम्ही सांगितलं आहे. तसेच भविष्यात आमचं राज्य सरकार आल्यावर आम्ही काय करणार आहोत, महाराष्ट्राची कशी प्रगती होणार आहे. हे आम्ही सांगितलं आहे. परंतु आता महाराष्ट्रात ज्या योजना दिल्या आहे. लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबील माफीसह अनेक योजना आज महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रभावित करणाऱ्या आणि विश्वास देणाऱ्या ठरल्या आहेत. परंतु या योजनांना विरोध करण्याचं काम विरोधी पक्षाने केलं आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.
प्रविण दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती देण्याचं काम स्थगिती सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलं. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला प्रगती आणि गती या सरकारने दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये ही गोष्ट ठाम आहे की, हेच महायुतीचं सरकार आपल्याला हवं आहे. तशाप्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे झालं आहे. त्यामुळे धोरण राबवून, जसं की अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु दगड कोणी मारला हे येईल समोर, कारण आम्हीच चौकशीची मागणी केली आहे, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा
विरोधकांकडून वातावरण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न
दरम्यान, प्रविण दरेकर म्हणाले की, आता विरारमध्ये झालेला प्रकाराबद्दल बोलायचे झाले तर आपल्या पायाखालची वाळू सरकते आहे, त्यामुळे उरलेल्या एक-दोन दिवसात आपल्याला काही करता येतं आहे का? महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण आपल्या बाजूने वळवता येतो आहे का? यासाठी केविलवाणे दुर्दैवी आणि हतबलतेतून त्यांच्याकडून असे प्रकार होत आहेत, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.