पालघर: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी महिलेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. गुरुवारी बच्चू कडू यांनी याप्रकरणी जिल्हाधिकार्यांची चांगलीच कानउघडणी केली. तेव्हा कुठे महसूल विभागाने मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आदिवासी महिलेने उपोषण मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पात तलासरी तालुक्यातील आमगाव येथील आदिवासी महिला जेठाबाई काचरा यांची जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. त्याचा मोबदला न मिळाल्याने हा पैसा अधिकारी आणि दलालांनी गिळंकृत केल्याचा आरोप करतर जेठीबाई काचरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.
जेठीबाई यांचे कोर्टात दोन दावे प्रलंबित असतानाही सामनेवाले यांच्या खात्यात पैसे वर्ग केले होते. आपल्या हिस्साचे पैसे प्राधिकरणाचे अधिकारी भगवानजी पाटील आणि बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकारी सचिन तोडकर यांनी खाल्ले असल्याचा आरोप उपोषणकर्त्या जेठाबाई यांनी केला आहे. सातबारा उतार्यावर भावाचे नाव असून जेठाबाईंनी आपला हक्क सिध्द करावा. त्यानंतर मोबादला दिला जाईल, असे सांगत जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे बुधवारी जेठाबाई काचरा यांची प्रकृत्ती खालावली होती. त्यानंतरही त्यांनी उपोषण सुरुच ठेवले होते. दरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू गुरुवारी सकाळी पालघरमध्ये आले होते. त्यांनी उपोषणस्थळी जाऊन जेठाबाईंची भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची चांगलीच कानउघडणी केली. तेव्हा प्रशासनाने चौकशी करून जेठाबाईला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तसेच संबंधित खातेदाराची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरु केल्याचेही सांगितले. त्यानंतर बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जेठाबाईंनी उपोषण मागे घेतले.